#MarathaKrantiMorcha मराठवाड्यात आंदोलनाची धग कायम

औरंगाबाद - शहरातील क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी रविवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारविरोधात बोंब ठोकताना समन्वयक, कार्यकर्ते.
औरंगाबाद - शहरातील क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी रविवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकारविरोधात बोंब ठोकताना समन्वयक, कार्यकर्ते.

औरंगाबाद - आरक्षणासह विविध मागण्यांसाठी परळीतून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची धग रविवारी (ता.२२) विविध जिल्ह्यांत कायम होती. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर परिसरात कुठलेही आंदोलन न करण्याचा निर्णय औरंगाबादेत झाला. तर, येत्या नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्धार लातूरात झाला. दरम्यान मराठवाड्यात रविवारीही ठिकठिकाणी ठिय्या आंदोलनांसह, रास्तारोको व निदर्शने करण्यात आली.

पंढरपूर परिसरात आंदोलन नकोच  
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय औरंगाबादेत घेण्यात आला. पंढरपूर परिसरात कुठलेही आंदोलन करू नये; तसेच राज्यभर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवावे, असे मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले. शहरातील क्रांती चौकात रविवारी (ता. २२) दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. 

त्याठिकाणी मोर्चेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी समन्वयक म्हणाले, ‘‘ज्याठिकाणी वारकरी थांबले असतील, त्या परिसरात सरकार विरोधातील मराठा क्रांती मोर्चाने कुठलेही आंदोलन करू नये. तसेच मराठा समाजाने त्याप्रकारचा प्रयत्न करू नये. वारीच्या आडून काही धर्मांध शक्ती मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने गोंधळ घालण्याची शक्‍यता आहे, त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचेही त्यांचे कारस्थान आहे. मराठा आरक्षण आणि आरक्षणाशिवाय होत असलेली मेगा भरती रद्द करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन हे जिथे वारकरी थांबले नसतील, अशा ठिकाणी करावे, असा निर्णय औरंगाबादेत घेण्यात आला. 

जे होईल त्याला सरकार जबाबदार
बीड - परळी येथील आंदोलनस्थळी रविवारी मोर्चाच्या संयोजकांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. होऊ घातलेली मेगा नोकर भरती रद्द केल्याशिवाय मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन थांबणार नाही. यापुढे जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा ठिय्या आंदोलनाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. पाटोदा तहसील परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. लिंबादेवी फाट्यावर (ता. पाटोदा) सकाळी दहाला करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे नगर-बीड रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी तहसीलदार रूपा चित्रक व पोलिस निरीक्षक एस. जे. माने यांना निवेदन देण्यात आले. 

आरक्षण मिळेपर्यंत लढाई सुरूच
लातूर - समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असून, येत्या नऊ ऑगस्टला क्रांती दिनी या प्रश्नी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय येथे रविवारी झालेल्या मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधूनच यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यात ५८ मोर्चे काढूनही हाती काही लागले नाही. दिशाभूल करा अन्‌ वेळ मारून न्या, हा कावा सरकारने अवलंबला आहे. आता मूक न राहता ठोकपणेच यास उत्तर देण्याचे व ‘गनिमी कावा’ तंत्राने आंदोलने करण्यात येणार असल्याचे या बैठकीतून सांगण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके व गावागावांतील नागरिकांना अवगत करून हे आंदोलन ऐतिहासिक करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मराठा लोकप्रतिनिधींच्या मौनाबाबत तरुणांनी यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला. समाजाचे वाटोळे करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असेही आवाहन या बैठकीतून करण्यात आले. 

कळंब शहर कडकडीत बंद
कळंब - परळी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा समितीच्या वतीने दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून मोडीत काढल्याचे पडसादही शहर बंद करण्याचे आवाहन करतेवेळी उमटत होते. मात्र, बंदच्या काळात एसटी बस सेवा सुरळीत ठेवण्यात आली होती. शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर ‘कळंब बंद’चे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्याने या संदर्भात शनिवारी दिवसभर शहरात चर्चेला उधाण होते.

जिल्हानिहाय पडसाद...
लातूर - शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन बसवर दगडफेक 
जालना - जिल्ह्यात मंगळवारपासून (ता.२४) तीन टप्प्यांत आंदोलन करण्याचा बैठकीत इशारा. 
हिंगोली - डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथे सकाळी बसवर दगडफेक. 
नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच. 
परभणी - मानवत तहसीलसमोर धरणे, पाथरी येथे बसवर दगडफेक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com