औरंगाबादेत बनावट आधार कार्डचा गोरखधंदा 

aurangabad CP Office
aurangabad CP Office

औरंगाबाद - बनावट रेशनकार्डांसह आधार कार्ड बनविणाऱ्या तिघांना गुरुवारी (ता. 22) सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची कारवाई हडकोतील एन-13 भागातील आधार सेंटरवर करण्यात आली.

महंमद हबीब महंमद हनीफ (28, रा. बारापुल्ला गेट, कोतवालपुरा), सय्यद हमीद सय्यद हबीब (45, रा. मुजफ्फरनगर, एन-13, हडको) आणि पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (52, रा. एन-13, हडको) अशी त्यांची नावे आहेत. सय्यद हमीद हा जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार आणि रेशनकार्ड बनवून देत असल्याची थाप मारत असे. महंमद हबीब आणि सय्यद हमीद हे दोघेही नात्याने भाऊ आहेत.

पूनमचंद गणोरकर याच्याशी त्यांची जुनी ओळख होती. पूनमचंदच्या घरात; तर सय्यद हमीदच्या दुकानात बनावट कार्ड बनविण्याचे काम सुरू होते. हे तिघेही गेल्या दोन वर्षांपासून सोबत काम करीत होते. तिघेजण बनावट कार्ड बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सहाच्या सुमारास पथकातील नंदू चव्हाण, सुधाकर राठोड, लालखॉं पठाण, विजयानंद गवळी, योगेश गुप्ता, सुभाष शेवाळे, सय्यद अशरफ, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे अणि रेखा चांदे यांनी हडकोतील न्यू आधार मल्टी सर्व्हिसेसवर छापा मारला.

यात पोलिसांनी पिवळ्या आणि केशरी रंगाचे सुमारे 55 रेशनकार्ड, 19 आधार कार्ड, लॅपटॉप, संगणक, कलर प्रिंटर, फोटो पेपर, पेपर कटिंगचे साहित्य, 50 आयकॉनिक स्टिकर असे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, मतदान कार्ड बनविण्यासाठी उपयोगात येणारे आयकॉनिक स्टिकर त्यांनी कोठून आणले, याचा शोध घेतला जात आहे. 

एकाच व्यक्‍तीचे चार आधार कार्ड 
याप्रकरणी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी एकाच व्यक्तीचे चार आधार कार्ड बनविल्याचे समोर आले. त्यावरून त्यांनी अनेकांचे अशाच पद्धतीने बनावट आधार कार्ड तयार केल्याचा संशय आहे. त्यामुळे या तिघांची एटीसीकडूनही चौकशी करण्यात यावी, अशा सूचना घाडगे यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com