विद्यापीठाच्या उपकुलसचिवास बेड्या

Ishwar-Manjha
Ishwar-Manjha

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्‍वर मंझा याने चक्क नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगाराची फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात गुन्हा नोंद करून आर्थिक गुन्हेशाखेने मंझाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (ता. १९) रात्री उशिरा करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.

ईश्‍वर रायभान मंझा (वय ५१, रा. बंगला क्रमांक ५०, ईटखेडा, सातारा परिसर) विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रात उपकुलसचिवपदी कार्यरत आहे. २०१५ मध्ये देवनाथ माणिकराव चव्हाण (रा. चिकलठाण, ता. कन्नड जि. औरंगाबाद) याची त्याच्याशी भेट झाली होती. त्यावेळी मंझाने आपण विद्यापीठात उपकुलसचिव पदावर आहे. विद्यापीठ व विद्यापीठाबाहेरील महाविद्यालयात आपली मोठ्या प्रमाणात ओळख आहे. विद्यापीठात व संलग्न महाविद्यालयात कारकुनांची पदे भरण्यात येत आहेत, असे सांगितले. यावर विश्‍वास ठेवून देवनाथ चव्हाण यांनी ऑक्‍टोबर २०१५ ला तीन लाख रुपये भावाकरवी मंझाला दिले. उर्वरित तीन लाखांची रक्कम दिवाळीनंतर द्यावी लागेल, यादरम्यान नोकरीची ऑर्डर चव्हाण यांना द्यावी लागेल, असे त्यांच्यात ठरले होते. जानेवारी २०१६ मध्ये मंझाला चव्हाण भेटले व ‘आम्ही तुम्हाला तीन लाख दिले, उर्वरित रक्कमही जमा आहे, ऑर्डर कधी देता,’ अशी विचारणा केली. त्यावर ईश्‍वर मंझा याने टाळाटाळ करून थांबण्यास सांगितले. आपण फसलो हे लक्षात येताच चव्हाण यांनी मंझाकडे ‘नोकरी नको, पैसे द्या’, अशी मागणी वारंवार केली. त्यावेळी अरेरावीची भाषा वापरून पैसे देण्यास नकार देत धमकावले. यामुळे हतबल चव्हाण यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची भेट घेतली.

त्यानंतर याप्रकरणात आयुक्तांच्या सूचनेनुसार, छावणी पोलिस ठाण्यात ईश्‍वर मंझाविरुद्ध फसवणूक व धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद झाली. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला घरातून अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले, सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, पोलिस शिपाई योगेश तळवंदे, मनोज उईके, दादासाहेब झारगड, महेश उगले, सचिन संपाळ, विनोद खरात यांनी केली.

अटकेनंतर मंझाला मंगळवारी (ता. २०) दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. देवर्षी यांच्यासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी हे प्रकरण गंभीर असून, यामध्ये मंझासोबत आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याची माहिती घ्यायची आहे; तसेच रक्कम हस्तगत करायची आहे, त्यामुळे कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती ग्राह्य धरून न्यायालयाने ईश्‍वर मंझा याला शनिवारपर्यंत (ता. २४) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

धनादेशही वटले नाहीत
चव्हाणकडून वारंवार होणारी पैशांची मागणी टाळण्यासाठी मंझाने नामी युक्ती शोधली. त्याने चव्हाणला धनादेश दिले; पण धनादेश दिलेल्या बॅंक खात्यात त्याने रक्कमच ठेवली नाही. त्यामुळे त्याने चव्हाण यांना दिलेले धनादेश बॅंकेत वटले नाहीत. असे वारंवार घडले. 

चक्क ऑफर
सूत्रांनी माहिती दिली, की मंझाला ताब्यात घेण्यासाठी पथक गेले, त्यावेळी मंझाच्या घरी पाहुणे आले होते. सकाळी येतो, आता सोडून द्या, अशी विनंती करून त्याने चक्क पोलिसांना ऑफरही दिली; पण पोलिसांनी चोख कामगिरी बजावत त्याला बेड्या ठोकल्या.

पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर कारवाई
पोलिसांनी उपकुलसचिव ईश्‍वर मंझा यांना अटक केल्याची माहिती कानावर आली आहे; मात्र पोलिसांकडून याबाबत काहीच कळविण्यात आले नाही. त्यांच्याकडून अधिकृत पत्र मिळाल्यानंतर मंझा यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. दिवसभर अभ्यास मंडळाची मतमोजणी सुरू होती. त्यामुळे मंझाविषयी सायंकाळी पाच वाजता कुलगुरू, कुलसचिव यांच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्यापीठाकडून मंझावर काय कारवाई होणार हे बुधवारी (ता. २१) समजेल.

मंझा अडकले चौथ्यांदा
ईश्‍वर मंझा २००५-०६ मध्ये गुणवाढ प्रकरणात निलंबित झाले होते. चार उत्तरपत्रिकात त्यांनी गुणवाढ केली होती. त्यानंतर पाचोडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा सहायक असताना कार्यालय अधीक्षक असल्याचे सांगत खोटे आरोग्य प्रमाणपत्र सादर करीत बढती मिळविली होती. दोन वर्षांपूर्वी धनादेश न वटल्याने त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादच्या उपकेंद्रात उपकुलसचिव पदावर रुजू झाले होते. आता पुन्हा या प्रकरणात अडकल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची ही चौथी वेळ असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com