अंध- दिव्यांग नवदांपत्यांच्या आनंदापुढे गगनही ठेंगणे 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 19 एप्रिल 2018

समाजातील गरजा लक्षात घेण्याची गरज 
समाजातील गरजा लक्षात घेऊन त्यावर मात करायला हवी. त्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर इच्छाशक्‍ती महत्त्वाची आहे. कमी पैशात देखील सर्वांच्या परिश्रमामुळे 32 जोडप्यांचे विवाह करू शकलो. अशा उपक्रमांची समाजाने प्रेरणा घेतल्यास व्यापक पातळीवर मोठा बदल पहायला मिळेल. 
- प्रवीण सोमाणी, अध्यक्ष, जायंट्‌स ग्रुप, औरंगाबाद. 

औरंगाबाद - विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन, असे वर्णन केले जाते. मात्र, अलीकडे हे विवाह जुळविण्यापासून ते पार पडेपर्यंत नातेसंबंध जपण्यासाठी दोन्हीकडील मंडळींना मोठी घालमेल सहन करावी लागते. सर्वकाही मनाप्रमाणे भव्य, दिव्य असायला हवे, अशी सोयऱ्या-धायऱ्यांकडून अपेक्षाही ठेवली जाते. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देत सामूहिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या अंध, दिव्यांगांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे बोलके चित्र येथे बघावयास मिळाले. 

जायंट्‌स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड, नाम, भाईश्री फाउंडेशन आणि तोतला परिवारातर्फे बुधवारी (ता. 18) सामुदायिक विवाह सोहळा श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमियॉं दर्गा चौक येथे अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या विवाह सोहळ्यात वरखेड (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील डी. एड. झालेल्या अंध विजय उबाळे यांचा नेवासा (जि. नगर) तालुक्‍यातील निशा पांडुरंग शिरसाठ, तर भारतनगर येथील अंध गणेश आसाराम शिंदे यांचा पाथरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथील दिव्यांग असलेल्या प्रतिमा सावंत सोबत विवाह पार पडला.

आमचा विवाह असा मोठ्या थाटात विवाह होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना व्यक्‍त करताना त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आम्हाला आयुष्याचा जोडीदार मिळाल्याने आता आमचे जगणे सोपे होणार असल्याचा आशावाद त्यांनी हसऱ्या चेहऱ्यांनी व्यक्‍त केला. ते बघू शकत नसले तरी त्यांचे चेहरे खूप काही सांगत होते. 
नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्यानंतर अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, "हुंडाच नव्हे, तर लग्नासाठी पैसे नसल्याने मुली आत्महत्या करीत असल्याच्या घटना वेदनादायी आहेत. त्यामुळे हुंडा ही प्रथाच बंद करण्यासाठी तरुणाई पुढे आल्यास नैराश्‍याचे वातावरण दूर होण्यास मदत होईल,' असे भावनिक आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती मुळासकट उखडून टाकण्यासाठी समाजाने विचार केल्यास नक्‍कीच सकारात्मक पाऊल पुढे पडेल. 

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर या सामूहिक विवाह सोहळ्यात आत्महत्याग्रस्त, दुष्काळग्रस्त, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील 32 जोडपी विवाहबंधनात अडकली. सकाळी अकराला रुखवत वितरण करण्यात आले. दुपारी तीनला वरात काढून सायंकाळी मुख्य विवाह सोहळ्यास सुरवात झाली. औरंगाबाद, जालनासह मराठवाड्यातील वधू-वर वऱ्हाडी मंडळींसह सकाळीच विवाहस्थळ असलेल्या श्रीहरी पॅव्हेलियन येथे दाखल झाली होती. संयोजकांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. 

श्री. बालब्रह्मचारी महाराज यांच्यासह हजारो वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी वस्तू, मंगळसूत्र आदी साहित्यांसह लग्नस्थळी येण्या-जाण्याचा सर्व खर्च संयोजकांनी केला. या विवाह सोहळ्यास भाईश्री रमेशभाई पटेल, भावेश पटेल, ऍड. रामेश्वर तोतला, राहुल तोतला, आमदार अतुल सावे, जायंट्‌सचे अध्यक्ष प्रवीण सोमाणी यांनी नवजोडप्यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यासाठी सचिव अभय शहा, दिनेश मालानी, विजय चौधरी, राजेश वैष्णव, महेश डागा, नितीन अग्रवाल, शाम खटोड, गोपाल सारडा, पल्लवी मालानी, विनोद अग्रवाल, निखिल सारडा, श्वेता सोमाणी व सरिता मालानी, नितीन राठी यांनी परिश्रम घेतले. 

समाजातील गरजा लक्षात घेण्याची गरज 
समाजातील गरजा लक्षात घेऊन त्यावर मात करायला हवी. त्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर इच्छाशक्‍ती महत्त्वाची आहे. कमी पैशात देखील सर्वांच्या परिश्रमामुळे 32 जोडप्यांचे विवाह करू शकलो. अशा उपक्रमांची समाजाने प्रेरणा घेतल्यास व्यापक पातळीवर मोठा बदल पहायला मिळेल. 
- प्रवीण सोमाणी, अध्यक्ष, जायंट्‌स ग्रुप, औरंगाबाद. 

Web Title: marathi news aurangabad news Blind -Handicapped new couples enjoying their relationship