औरंगाबादेतील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यास पालकमंत्री सावंत अपयशी

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आलेल्या पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे प्रयत्नही सपशेल फेल ठरले. नारेगाव येथील कचरा डेपोच्या ठिकाणी जाऊनही नागरिकांनी दाद न दिल्याने विभागीय आयुक्‍तालयात झालेल्या बैठकीतही काहीही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे पालकमंत्र्याचा दौरा फुसका बार ठरला असून, कचऱ्याच्या प्रश्‍नाने प्रशासनासह राज्यकर्त्यांचाही कचरा केल्याचे आठवडाभरातील घडामोडीवरून दिसून आले. 

पालकमंत्री डॉ. सावंत शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी शहरात दाखल झाले. त्यांनी कचरा डेपोच्या परिसरात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन काही दिवसांची मुदत मागितली. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्‍तालयात त्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत चाळीस मिनिटे झालेली चर्चा वायफळ ठरली. त्यामुळे डॉ. सावंत यांना कुठलाही निर्णय न घेता रिकाम्या हाताने मुंबईला परतावे लागले. 

बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ पाटील, विकास जैन, राजू शिंदे, विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, वर्षा ठाकूर, आयुक्‍त डॉ. मुगळीकर, पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव आदी उपस्थित होते. 

कचऱ्याच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठीच मी आलो. ग्रामस्थांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ते आलेच नाही. त्यामुळे तीन ते चार दिवसांत काहीतरी व्यवस्था करण्यात येईल. अन्यथा काय करता येईल ते पाहू. 
- डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री. 

आम्ही ठरविले तर नारेगाव येथेच कचरा टाकू शकतो. मात्र, काही जणांचा त्यास विरोध आहे. विरोध करणेही तसे योग्य नाही. त्यासाठी बळाचा वापर करणे किती योग्य आहे? असा प्रश्‍न आहे. आमच्यासमोर सध्या सफारी पार्कची शंभर एकर जमीन, पैठण तालुक्‍यातील बाभूळगाव येथील पर्याय आहेत. दोन दिवसांत तोडगा काढू. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com