३५ वर्षे देशसेवा, वर्ग-एक अधिकारी अन्‌ पेन्शन मिळते ७७७ रुपये!

Surendra-Surve
Surendra-Surve

औरंगाबाद - वयाच्या २३ व्या वर्षी सेनेत दाखल झालो. १९७१ च्या लढाईत पाकिस्तानविरोधात लढलो. वर्ग-एकचा अधिकारी म्हणून ३५ वर्षे देशसेवा केली. मात्र सेवानिवृत्ती वेतन आजही ७७७ रुपये मिळते याची खंत वाटते. सध्या १५ वर्षे सेवा करणाऱ्या जवानाची पेन्शन २३ हजार येते. किती विरोधाभास आहे? आम्ही भीक मागत नाही. आत्मसन्मानाची मागणी करतोय... ही व्यथा मांडली आहे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी.

कॅप्टन सुर्वे यांनी सांगितले, की सरकारकडे ईपीएफ अकाउंटमध्ये करोडो रुपये पडून आहेत. त्यातून ही मागणी सहज पूर्ण होऊ शकते. मात्र शासनाच्या इच्छाशक्‍तीचा अभाव आहे. ७७७ रुपयांत चरितार्थ कसा चालवायचा, हा प्रश्‍न आहे. त्यात वैद्यकीय सेवा कशा पूर्ण होतील? त्या मोफत मिळाव्यात ही रास्त मागणी आहे. आमदार, खासदार एका मिटिंगला हजर झाले तर त्यांना आयुष्यभर ८० हजारांची पेन्शन मिळते. साडेचारशे रुपयांत अनलिमिटेड मोबाईलची सुविधा असताना १५ हजार रुपयांचे फोन बिल शासन अदा करते. ७० वर्षात ज्यांनी देशाची परिस्थिती बदलण्यासाठी काही केले नाही, त्यांना भरघोस पेन्शन आणि ३५ वर्षे देशसेवा करणाऱ्याला तुटपुंजे वेतन हा विरोधाभास दूर करण्यासाठी आक्रमक आंदोलन हाती घेऊन आत्मसन्मानाची लढाई जिंकू, असा आत्मविश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्‍न जीवन-मरणाचे
शासनाच्या नाकर्तेपणाने ज्येष्ठ नागरिकांच्या जीवन-मरणाचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. तुटपुंज्या पेन्शनमध्ये आरोग्याचे प्रश्‍न सुटत नाहीत, घरात मुले सांभाळत नाहीत म्हणून अनेक ज्येष्ठांवर बसस्थानक किंवा रेल्वेस्थानकावर मुक्कामाची वेळ आली, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. 

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासगी क्षेत्रात तीस-पस्तीस वर्षे काम करून पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. तुटपुंज्या पेन्शनसाठीही मोठा संघर्ष करावा लागतो. घरखर्च कसा भागवावा हा प्रश्‍न सतावत असताना, आरोग्याचे वेगळे गंभीर प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. उतारवयामध्ये ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर, शुगर, कॅन्सर यासह विविध आजारांनी ग्रासलेले आहे. डॉक्‍टरांच्या तपासण्या आणि औषध-गोळ्यांचा खर्च न परवडणारा आहे. उपचाराअभावी अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्राण सोडावे लागले आहेत. अनेकांना तर एका गॅसच्या सिलिंडरइतकी म्हणजे आठशे रुपयांची पेन्शन मिळते. पेन्शन किती मिळते हे सांगायलाही लाज वाटते, अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या. महागाई गगनाला भिडली आहे. हृदयविकाराचा झटका आला तर प्राण सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. कॅन्सर किंवा अन्य दुर्धर आजार झाले तर अंथरुणावर खिळूनच प्राण सोडावा लागतो, अशी खंतही ज्येष्ठांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com