भरधाव कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर जागीच ठार

Accident
Accident

औरंगाबाद - भरधाव स्विफ्ट कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर कार झाडाला धडकून दोन डॉक्‍टर जागीच ठार झाले. तर तिसरा डॉक्‍टर गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबादेतील रामनगर कमानीजवळ मंगळवारी (ता. २०) पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान घडली. अपघात एवढा भीषण होता की कारचा बहुतांश भाग चेंदामेंदा झाला. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदकुमार सतनामसिंग (वय २५, रा. मूळ हरियाणा) व लक्ष्मीकांत दगडिया (वय २५, रा. रामनगर) अशी मृत डॉक्‍टरांची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी) हे डॉक्‍टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

जालन्याकडून तिघेजण पहाटे स्विफ्टने (एमएच- २०, डी. व्ही. ४९३२) औरंगाबादेत येत होते. रामनगर येथील कमानीजवळ त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यालगत एका झाडाला धडकली. धडक एवढी जोरात होती, की समोरील भाग आत दबून गोविंदकुमार व लक्ष्मीकांत हे ठार झाले. तर अरविंद पवार रक्तबंबाळ झाले. घटनेची माहिती समजताच मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड, पोलिस शिपाई मुंढे, ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात लावण्यात आली. अपघाताची नोंद ठाण्यात झाली.

तिघांची पार्श्‍वभूमी
गोविंदकुमार सतनामसिंग यांचे एमडीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यानंतर ते सावंगीकर रुग्णालयात प्रॅक्‍टिस करीत होते. तर मृत लक्ष्मीकांत दगडिया व जखमी अरविंद पवार यांचे बीएचएमएसचे शिक्षण झाले, ते फुलंब्री येथे रुग्णालयात प्रॅक्‍टिस करीत होते, अशी माहिती मुकुंदवाडी पोलिसांनी दिली.

कारमध्ये दारूच्या बाटल्या
पोलिसांनी कारची पाहणी केली, त्यावेळी आत दारूच्या बाटल्या होत्या. बहुदा ते मद्यसेवन केलेले असावेत. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मृतांच्या उत्तरीय तपासणी अहवालानंतरच या बाबी स्पष्ट होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com