जाहिरातबाजीपेक्षा शेतकऱ्यांसाठी पैसे खर्च करा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

''साडेतीन वर्षात कोणालाही अच्छे दिन आले नाहीत. सरकारच्या चुकीच्या शेतीधोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत''.

-  धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

बीड : ''भाजपचेच आमदार, खासदार पक्षावर नाराज आहेत. विविध आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी मिळाली. मात्र, शेतकऱ्यांचे पैसे कुठे गेले'', असा सवाल माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. तसेच सरकारने जाहिरातबाजीपेक्षा शेतकऱ्यांसाठी पैसा खर्च करावा, असेही ते म्हणाले.

सरकारच्या पोकळ घोषणा आणि फसवेगिरीने जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणतात, मात्र हा पैसा कुठे आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. 

मराठवाड्यात निघलेल्या हल्लाबोल यात्रेतील जिल्ह्यात होणाऱ्या सहा सभांपैकी पहिली सभा बुधवारी पाटोदा येथे झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार विद्या चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, चित्रा वाघ, नवाब मलिक उपस्थित होते.

पवार म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यापेक्षा सरकारला उद्योगपतींचा कळवळा आहे. त्यांची हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. जाती-धर्मात भांडणे लावत असून, अंतर पाडले जात आहे. कोरेगाव-भीमा दंगल सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच घडली. कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.

शिवसेना-भाजप भांडणाचे नाटक करत आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल असताना सरकार जाहिरातबाजीवर शेकडो कोटी रुपये उधळत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कोणालाच अच्छे दिन नाहीत : धनंजय मुंडे

''साडेतीन वर्षात कोणालाही अच्छे दिन आले नाहीत. सरकारच्या चुकीच्या शेतीधोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत'', असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

मराठा, मुस्लिम व धनगर समाजाने काढलेले आरक्षण मोर्चांना सरकारने छेद दिला. गोपीनाथ मुंडेंच्या नावाचा सरकार उपयोग करत असून, त्यांच्या नावाने काढलेल्या महामंडळातून एकही ऊसतोड मजूराला फायदा झाला नाही. या महामंडळाचे कार्यालय परळीत असल्याचे सांगितले जात असले तरी मला हे कार्यालय सापडले नसल्याचा टोलाही मुंडेंनी यावेळी लगावला.

Web Title: Marathi news beed news dont expense on advertise farmers give supports to farmers