माजलगाव धरणातील पाणीपात्रात संतप्त युवकांनी मारल्या उड्या 

कमलेश जाब्रस
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

माजलगाव (जि. बीड) : शहरालगत असलेल्या ११ पुनर्वसित गावांमधील पाणीपुरवठा नगर पालिकेने बंद केल्याने या गावातील ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले होते. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा या युवकांनी दिला होता. आज (ता. २३) या युवकांनी माजलगाव धरणातील पाणीपात्रात उड्या मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली असून पाणी प्रश्न पेटला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीने या पाणी योजनेच्या वीज बिलाचा ६० टक्के वाटा माजलगाव नगर पालिकेने तर ४० टक्के वाटा अकरा पुनर्वसित खेड्यांनी भरावा, असे ठरवून दिले आहे. परंतु, अकरा गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांनी मागील 20 दिवसांमध्ये या वाट्यापैकी एकही रूपया भरला नाही तर पालिका प्रशासनाने वाटा भरेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील अशी भूमिका घेतली आहे.

ग्रामपंचायती व पालिकेच्या वादामध्ये मात्र या गावातील ग्रामस्थ मागील 20 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, या मागणीसाठी या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते; तर युवकांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. परंतु पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत न झाल्याने अखेर आज मुक्तीराम आबुज, गणेश मारगुडे, विकास कांबळे, महादेव आबुज, पांडुरंग आबुज, विजय नरहीर, प्रकाश वाघमोडे, अनिल कांबळे, सिध्दार्थ सातपुते या युवकांनी माजलगांव जलाशयातील पाण्यात उडी मारून या पाणीप्रश्नी संताप व्यक्त केला.

दरम्यान हा पाणीप्रश्न पेटला असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या प्रश्नी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी पोलिस निरीक्षक राजु तळेकर, पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांचेसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते तर नगराध्यक्ष सहाल चाउस, गटविकास अधिकारी बी. टी. चव्हाण यांना चर्चेसाठी बोलावले आहे.

Web Title: marathi news marathi websites Beed News Drought Water Supply