औरंगाबाद बाजार समिती भाजपच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, अपक्षांनी सोबत येऊन विश्‍वास दाखिवल्यामूळे सभपती पद मिळाले. शेतकरी, व्यापारी, ग्राहक कर्मचारी, हमाल मापाडी हे सर्व आमचे केंद्र बिंदू आहे.त्यांचे प्रश्‍न सोडविणार. मोंढा स्थलांतराचा प्रस्ताव पाठवून कायदेशीर मार्गने ही प्रक्रीया करणार आहे. सर्व संचालकांना सोबत घेणार व्यापाऱ्यांना येथे गाळे देणार आहेत. मागील सभापतीचे प्रकरणाचा तपास करणार आहे. 
- राधाकिशन पठाडे, सभापती, बाजार समिती.

औरंगाबाद : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत शुक्रवारी (ता.एक) भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. पक्षाचे उमेदवार राधाकिशन पठाडे यांनी काँग्रेसचे उमेदवार राहुल सावंत यांचा 13 विरुद्ध 4 ने पराभव करत सभापतीपद मिळवले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व माजी आमदार कल्याण काळे यांच्या वर्चस्वाच्या लढाईत भाजपने बाजी मारली. 

कोट्यावधी रुपयांची उलढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध 11ऑगस्टला भाजपने 12 संचालकांच्या सह्यांनिशी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. 22 ऑगस्टला हा ठराव मंजूर करण्यात आला होता. यानंतर शुक्रवारी सभापतीसाठी निवडणूक घेण्यात झाली. यामध्ये भाजपकडून राधाकिशन पठाडे तर काँग्रेसकडून राहुल सावंत यांनी अर्ज दाखल केला होता.

सहाय्यक जिल्हा उपनिबंधक देवयानी भारस्वाडकर यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया पार पडली. यात उमेदवारांनी हात उंचवून मतदान केले. यामध्ये पठाडे यांना 13 तर सावंत यांना चार मते मिळाली; तर विकास दांडगे हे संचालक तटस्थ राहिले.

या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. 21 दिवसांपासून सुरु असलेल्या सभपती निवडीमुळे बाजार समितीचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

एकेकाळी भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या संजय औताडे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या गणेश दहिहंडे यांना फोडून सभापतिपदाची उमेदवारी दिली होती. औताडे आणि दहिहंडे यांना समसमान म्हणजे प्रत्येकी नऊ मते मिळाली होती. त्यामुळे सोडतीद्वारे औताडे यांची सभापतिपदी निवड झाली होती. तेव्हापासून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते.

राधाकिशन पठाडे, शिवाजी वाघ आणि बाबासाहेब मुदगल या काँग्रेसच्या तीन संचालकांना, तर देवीदास कीर्तीशाही या अपक्ष संचालकास फोडून भाजपने सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव पारीत करीत सभपतीपद आपल्याकडे खेचून आणले.