कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहंदी गॅंगवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

औरंगाबाद - खून प्रकरणातील आरोपी इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांवर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दिवंगत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांनी दगडफेक केली. या वेळी घोषणाबाजी करून स्टम्पनेही मारहाण झाली. यात सहाजण जखमी झाले असून, त्यांना घाटीत दाखल केले. दरम्यान, तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. घटनेनंतर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. 

औरंगाबाद - खून प्रकरणातील आरोपी इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांवर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दिवंगत माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांनी दगडफेक केली. या वेळी घोषणाबाजी करून स्टम्पनेही मारहाण झाली. यात सहाजण जखमी झाले असून, त्यांना घाटीत दाखल केले. दरम्यान, तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. घटनेनंतर कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचा ४ मार्च २०१२ ला खून करून मृतदेह पडेगाव येथील गायरान जमिनीत पुरण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल ट्रेस करून इम्रान मेहंदीसह अकरा संशयितांना अटक केली. त्यांच्यावर कुरेशी यांच्या खुनासह सहा खुनांच्या प्रकरणात मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे इम्रान कुरेशी व त्याच्या काही सहकाऱ्यांना साडेचारच्या सुमारास हर्सूल कारागृहातून न्यायालयात आणण्यात आले होते. कामकाज आटोपल्यानंतर इम्रान मेहंदीच्या तोंडावर काळा कपडा घालून न्यायालयातून बाहेर नेण्यात आले व पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये बसविले. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. यात शेख सद्दाम शेख इमाम (वय २५, रा. कटकटगेट) व मोहम्मद खालेद सिद्दिकी (वय २७, रा. आसेफिया कॉलनी) हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, अन्य जखमींची नावे कळू शकली नाहीत.

घाटीतील हल्ल्याचा प्रयत्न उधळला
दगडफेक करणाऱ्या जखमींवर हल्ला करण्यासाठी इम्रान मेहंदी याचे सुमारे पन्नासपेक्षा अधिक समर्थक घाटीत गेले होते. त्यांनी कुरेशी समर्थकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला; पण या वेळी पोलिसांनी खबरदारी घेत मोठा फौजफाटा लावून आठ जणांना पकडण्यात यश मिळवले. त्यांना पकडण्यात मोठी पळापळ झाली. पोलिस त्यांचा हल्ला उधळण्यात यशस्वी ठरले असून, एकूण तेरा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी दिली. या प्रकरणात परस्पर तक्रारी प्राप्त झाल्या असून, चौकशीनंतर गुन्हा नोंदविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

ते वाटच पाहून होते...
इम्रान मेहंदी व सहकारी न्यायालयातून कधी बाहेर येतात, याची वाट पाहत सुमारे पन्नास जणांचा जमाव ओट्यावर बसला होता; मात्र काळा कपडा असल्याने मेहंदी ओळखूच आला नाही. पाठोपाठ आलेल्या त्याच्या सहकाऱ्यांवर कुरेशी समर्थकांनी एकच हल्लाबोल करून दगडफेक केली. दरम्यान, स्टम्पनेही मारहाण करून घोषणाबाजी केली.

बंदोबस्तात नेले कारागृहात
या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालय परिसरात बंदोबस्त लावला. तत्पूर्वी मेहंदी व त्याच्या सहकाऱ्यांना पोलिस बंदोबस्तात हर्सूल कारागृहात नेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: marathi news marathwada news attack imran mehandi gang