अल्पवयीन मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकींची चोरी!

two-wheeler
two-wheeler

औरंगाबाद : तेरा ते एकवीस वयातील मुलांकडूनच सर्वाधिक दुचाकी चोरी होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा यात सहभाग असून, पोलिस विभागात दुचाकी चोरीवर विशेष काम केलेल्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षण व अभ्यासातून ही बाब समोर आली. याचाच अर्थ मुलं, तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची ही गंभीर विदारकताच असून, चिंता वाढवणारीही आहे. 
दुचाकी चोरी सहज, तत्काळ होणारी बाब असून, ते सॉफ्ट क्राईम म्हणून ओळखले जाते. सहज साध्य होणाऱ्या गोष्टींकडे अनेकजण आकृष्ट होतात.

महाविद्यालयीन जीवनात कुटुंबीयांकडून मिळणारा तोकडा पॉकेटमनी, अवास्तव वाढलेला खर्च भागविण्यासाठी अनेक तरुण या गुन्ह्याकडे वळत आहेत. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे मुलांना दुचाकी देण्यास कुटुंबीयांची असमर्थता असो, की बहुधा लहान वयात त्यांना दुचाकी देण्याचे टाळणे असो यातून मुलं हौस, क्रेझ पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. गुन्हेगारी प्रवृत्तींसोबत संगत लागली, की प्रसंगी चोरीची वाट पकडून हौस भागवतात. त्यानंतर याच "उद्योगात' रममाण होतात. सहज पैसे मिळवण्याची चटक स्वस्थ बसू देत नाही. त्यातून दुचाकी चौर्यकर्माच्या आहारी जाऊन पोलिसांच्या जाळ्यात सापडतात. पोलिसांच्या हाती लागलेल्यांत अल्पवयीन मुलं व महाविद्यालयीन तरुणांचाच अधिक भरणा असून, ही बाब अस्वस्थ करणारी आहे.  

दुचाकी चोरीनंतर काय? 
दुचाकी चोरीनंतर कागदपत्रांशिवाय मिळेल त्या दरात दुचाकींची विक्री केली जाते. त्यातून येणारा पैसा चैनीसाठी वापराला जातो. ही मुलं, तरुण या पैशांतून व्यसन करतात. मौजमस्तीसाठी आणि फिरण्यावर खर्च करतात. मुलींना इम्प्रेस करण्यासाठी, त्यांच्यावरील खर्च भागवण्यासाठी दुचाकी चोरी केल्याची कबुलीही यातील अनेक तरुणांनी पोलिसांकडे दिली. 

ग्रामीण भागात विक्री का? 
शहरात चोरी उघड होऊ नये म्हणून गावागावांत गरजू ग्राहकांपर्यंत दुचाकी विक्री केली जाते. यात शेतकरी, श्रमिकवर्गाला स्वस्तात गाडी विकली जाते. महागड्या दुचाकीही आठ ते बारा हजारांपर्यंत मिळत असल्याने; तसेच पोलिसांकडून अडवणूक होणार नाही याची कल्पना असल्याने ग्रामीण भागात दुचाकींची सर्रास खरेदी होते. कधी तोंडी तर कधी बॉंडवरच व्यवहार होतो. 

चोरीच्या दुचाकी जातात कोठे? 
दुचाकी चोरी ही देशभरातील डोकेदुखी आहे. यासाठी विशिष्ट गॅंगही काम करतात. दुचाकी चोरीनंतर त्या परराज्यात पाठविल्या जातात. बहुधा दुचाकींचे पार्टस्‌ सुटे केली जाते. दुचाकी व पार्टस्‌ची ट्रकद्वारे इतरत्र वाहतूक होते. स्क्रॅप माल म्हणून खरेदीही होते. काही ठिकाणी प्राप्त चोरीच्या दुचाकींच्या चेसीस क्रमांकांत अफरातफर करून नवीन दुचाकीही तयार केल्या जातात. मध्यप्रदेशातील इंदौर, छिंदवाडा, गुजरात आदी भागांत या दुचाकी पाठवल्या जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com