नरेंद्र मोदी 2019 ला पंतप्रधान होणे अशक्‍य : कुमार केतकर

जयपाल गायकवाड
रविवार, 25 जून 2017

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राम जरी आले, तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्‍य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले आहे. नांदेड येथे आयोजित पाचव्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते.

नांदेड - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष राम जरी आले, तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्‍य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले आहे. नांदेड येथे आयोजित पाचव्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आज (रविवार) प्रगतशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठाण तथा "उद्याचा मराठवाडा' यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे संविधानाची प्रस्ताविका वाचून उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर, डॉ. प्रज्ञा दया पवार, संजय आवटे, कॉ. भालचंद्र कांगो, डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली), उत्तम कांबळे, संजीव कुळकर्णी, महापौर शैलजा स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी "राज्य घटनेतील सामाजिक संकल्पना' या विषयावर केतकर बोलत होते. ते म्हणाले, "2019 च्या निवडणुकीत भाजपला 180 ते 220 पर्यंत जागा मिळाल्या तरी त्यांना सत्ता स्थापन करता येणे शक्‍य नाही. कारण त्यांची संयुक्त सत्ता चालविण्याची मानसिकता नाही. सध्या सरकार चार लोकांवर चालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डोबल आणि अरुण जेटली यांच्याकडेच सर्व सूत्रे दिसतात. कोणतेही निर्णयाबाबत निश्‍चितता नसते. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटांबदी करताना काळा पैश्‍याला लगाम लावण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. हळूहळू लक्षात आले की नोटाबंदीचा काळा पैशांवर काहीच परिणाम झाला नाही. मग त्यालाच उद्देशून कॅशलेशसाठी करण्यात आले असे सांगण्यात येऊ लागले. पण नंतर लक्षात आले की, लोकांकडे ते वापरण्याचे ज्ञानच नाही. एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसू लागली, लेस कॅश करत-करत "डिजिटल इंडिया'कडे गेले आता जीएसटीवर बोलत आहेत.'

केतकर पुढे म्हणाले, "नोटाबंदी, जीएसटीच्या विरोधात बोलले की, देशविरोधी बोलले जात आहे. सरकारच्या भूमिकेला विरोध करणे म्हणजे देशद्रोह समजला जात आहे. न्याय, समता, माया, बंधुता दाखवता येत नाही ती प्रत्यक्षात मनात रुजल्याशिवाय समूह शक्‍य नाही. ते सत्तेत आले तुमच्या आमच्यामुळे. भाजपला फक्त 31 टक्के मते मिळाली आहेत. देशातील 70 टक्के विरोधात आहेत. त्यांच्या सत्तेचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे इतिहास उध्वस्त करणे हेच आहे. लोकांवर संमोहन करण्यात आले असले तरी जास्त काळ संमोहन टिकत नाही. काही संमोहनात असलेले लोक महागाईचे चटके व नोटांबदीचा फटका बसला तरीही "मोदी अच्छा कर रहा है' असे म्हणत आहेत. संमोहित अवस्थेतून बाहेर आल्यानंतर दुखायला लागते. नव मध्यम वर्गाला आता त्याची जाणीव होईल. 2019 मध्ये भाजपचा पराभव होईल. पण त्यांचा पराभव कॉंग्रेसमुळे होणार नाही. तसेच अमेरिकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट कोणत्याही मूल्यासाठी नाही; तर आयटी इंडस्ट्रिमधील लोकांना काढू नका, अशी भीक मागण्यासाठी आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय जातीयवादी आहेत. ते येथील गोरक्षकांचे भाऊ असून तेथील कृष्णवर्णीयांच्या विरोधात असल्यामुळे ट्रम्प यांच्या बाजूने होते.'

यावेळी उदघाटन झाल्यानंतर संमेलनाची प्रस्तावना डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली, तर कार्यक्रमाची भूमिका संमेलन समन्वय समितीचे प्रमुख नयन बारहाते यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.पी.विठ्ठल यांनी केले.