लाचप्रकरणी अतिरिक्त शासकीय अभियोक्‍त्यास दीड वर्षाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

खुनाचा खटला तुझ्यावरच पलटवितो, अशी भीती घालून फिर्यादीकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त शासकीय अभियोक्‍त्यास दीड वर्षाच्या कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश सादराणी यांनी आज (बुधवारी) सुनावली.

परभणी - खुनाचा खटला तुझ्यावरच पलटवितो, अशी भीती घालून फिर्यादीकडून दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त शासकीय अभियोक्‍त्यास दीड वर्षाच्या कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश सादराणी यांनी आज (बुधवारी) सुनावली.

या प्रकरणातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 27 जानेवारी 2009 रोजी तक्रार दिली होती. यात आरोपी परभणी सत्र न्यायालयातील शासकीय अभियोक्ता नामदेव व्यंकटराव घुगे व बळिराम आबाजी बुधवंत यांनी तक्रारदारास त्यांच्या आईच्या खुनाचा खटला तुझ्यावरच पलटवितो, असे सांगून तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून सापळा लावून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून तत्कालीन पोलिस निरीक्षक ए. ए. कदम यांनी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. हा खटला विशेष न्यायालयात चालला.

याप्रकरणी न्यायालयाने आज (बुधवार) निर्णय देऊन नामदेव व्यंकटराव घुगे यांना दीड वर्ष कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात दुसऱ्या आरोपीस निर्दोष मुक्त करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक एन. एन. बेंबडे यांनी दिली.