आंबा, चिंचेची तीन हजारांपेक्षा अधिक झाडे खाक

वाशी - वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत आंबा व चिंचेच्या झाडांचे झालेले नुकसान.
वाशी - वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत आंबा व चिंचेच्या झाडांचे झालेले नुकसान.

वाशी - वीजतारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत आंब्याची बाग जळून खाक झाली आहे. या बागेत आंबा, चिंचेची तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त झाडे जळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे जवळपास ११ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही दुर्घटना बुधवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता घडली.

पंधरा वर्षांपूर्वी पारंपरिक शेतीला फाटा देत येथील (कै.) महादेवराव देवडीकर यांनी तब्बल १८ एकरांवर आंबा व चिंचेच्या झाडांची लागवड केली होती. दोन झाडे आंब्याची व एक झाड चिंचेचे याप्रमाणे ही लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला होता. या बागेत दोन हजार विविध जातींच्या नामांकित आंब्याची व आठशेपेक्षा अधिक चिंचेची झाडे होती. याची दखल घेऊन त्यावेळी (कै.) महादेव देवडीकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. महादेवराव देवडीकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. सध्या त्यांची मुले धनंजय देवडीकर व तानाजी देवडीकर या बागेची देखभाल करीत होते.

यावर्षी या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहोर लागलेला होता. रत्ना, केशर जातीच्या आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल असे अपेक्षित होते; मात्र बुधवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीच्या तांडवामुळे आंबा उत्पादक देवडीकर बंधूंची आशा धुळीस मिळाली आहे. आंब्याच्या बागेतून गेलेल्या वीजतारांचे वाऱ्यामुळे घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे बागेने पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण १८ एकरांवरील आंबा व चिंचेची झाडे जळाली असल्याची माहिती धनंजय देवडीकर यांनी दिली.

शरद पवार यांनी केली होती बागेची पाहणी
आंब्याच्या बागेची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भेट दिली होती. तसेच उस्मानाबाद येथील तीन जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या बागेला भेट देऊन येथील रत्ना व केशर आंब्याचा आस्वाद घेतला असल्याची माहिती धनंजय देवडीकर व तानाजी देवडीकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com