पॉलिशच्या बहाण्याने पळविले महिलेचे दागिने

पॉलिशच्या बहाण्याने पळविले महिलेचे दागिने

उस्मानाबाद - भांड्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने एका महिलेचे दागिने दोन भामट्यांनी पळविले. ही घटना शहरात बुधवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा अज्ञात चोरट्यांविरुद्ध दाखल झाला.

येथील अश्‍विनी करंडे या घरामध्ये आत्याबरोबर होत्या. त्यांचे पती वकील असल्याने ते न्यायालयाच्या कामकाजासाठी सकाळी दहाच्या सुमारास घराबाहेर गेले होते. घरात दोघीच असताना अकराच्या सुमारास दोन युवक घराजवळ आले. हिंदीमध्ये त्यांनी श्रीमती करंडे यांना पितळी भांड्यांना पॉलिश करायचे का, अशी विचारणा केली. पॉलिश करण्याबद्दल आग्रह केल्याने श्रीमती करंडे यांनी पहिल्यांदा पितळी निरंजन पॉलिश करण्यासाठी दिले. त्या दोघांनी निरंजन पॉलिश करून लगेच परत केले. त्यानंतर श्रीमती करंडे यांनी अजून कशाला पॉलिश करता येते असे विचारले असता सोने, चांदी अशा वस्तूंनाही पॉलिश करतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर श्रीमती करंडे यांनी दोन अंगठ्या पॉलिश करण्यासाठी दिल्या. त्या पॉलिश करुन परत केल्यानंतर अजून काही असेल तर आणा, असे ते दोघे म्हणाले. तेव्हा श्रीमती करंडे यांनी दीड तोळे सोन्याचे मिनी गंठन (अंदाजे किंमत ४२ हजार) व तीन ग्रॅमची अंगठी (अंदाजे आठ हजार) पॉलिशसाठी दिले. त्यांनी गरम पाणी घेऊन या, असे श्रीमती करंडे यांना सांगितले. त्या पाणी आणण्यासाठी आत गेल्या असता एकाने दुचाकी काढली. श्रीमती करंडे पाणी घेऊन येईपर्यंत दोघेही दुचाकीपर्यंत पोहचले होते. हे निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली; परंतु तोपर्यंत चोरटे फरारी झाले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com