फुलंब्रीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची सर्रास लूट 

नवनाथ इधाटे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

फुलंब्री  - खरीप हंगामात झालेल्या पावसाअभावी हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र येथेही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पांढरे सोने असलेला कापूस कवडीमोल दराने खरेदी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यापारी करू लागले आहेत. या प्रकाराकडे येथील बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

फुलंब्री  - खरीप हंगामात झालेल्या पावसाअभावी हवालदिल झालेला शेतकरी तोकड्या प्रमाणात निघालेली उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र येथेही व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. पांढरे सोने असलेला कापूस कवडीमोल दराने खरेदी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम व्यापारी करू लागले आहेत. या प्रकाराकडे येथील बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

निसर्गाचा कोप आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता याचा पुरता फटका त्यांना बसला असून पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यापैकी कापूस, मका व सोयाबीनचे निघालेले तोकडे उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणले जात आहे. याच संधीचा फायदा घेऊन येथील व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या अभयामुळे शेतकऱ्यांना विविध कारणे सांगून कवडीमोल भावात शेतीमाल खरेदी करणे सुरु केले आहे. अगोदरच घटलेल्या उत्पन्नाने तो आर्थिक कोंडीत सापडला आहे. सणासुदीच्या काळात घरी येणाऱ्या पाहुण्यांची काय सोय करावी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान व आता कवडीमोल दराने होत असलेल्या खरेदीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्चही निघेल की नाही ही चिंता शेतकऱ्यांना छळत आहे. दिवाळीनिमित्त माहेरी येणाऱ्या लेकीबाळींची दिवाळी अंधारातच साजरी करण्यावाचून दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहिला नाही. खरिपात पेरणीवर झालेला खर्च, पावसाअभावी सुकत चाललेली पिके त्यावर त्यांना प्रति बॅग सात ते दहा हजार रुपयांचा खर्च करावा लागला आहे. मात्र उत्पादन हाती यायला लागले असता शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या प्रकाराकडे पणन महासंघ व बाजार समितीने लक्ष देऊन कपाशी व मका या  पिकांना हमीभाव मिळवून द्यावा, अशी मागणी ते करू लागले आहेत.

व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा शेतीमाल हमीभावाप्रमाणे खरेदी करावा. शेतकऱ्यांच्या मालाची कमी भावाने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची तक्रार बाजार समितीला प्राप्त झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल.
- संदीप बोरसे, सभापती, बाजार समिती

बाजार समितीचे पदाधिकारी दिवाळीत गुंग 
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी पणन महामंडळाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती काम करते. शेतकऱ्यांना त्यांचे शेतीमालाला बाजारभाव उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बाजार समितीवर आहे. मात्र सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांची लूट सुरु असताना बाजार समितीचे पदाधिकारी दिवाळीत गुंग असल्याचे दिसत आहे.