पाण्याअभावी फळबागा धोक्‍यात 

पाण्याअभावी फळबागा धोक्‍यात 

भोकरदन - सततच्या दुष्काळी स्थितीमुळे आधीच तालुक्‍यातील फळबागा संकटात सापडल्या आहेत. त्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. तर विहिरी व विंधन विहिरीही तळाशी गेल्याने फळबागा कशा जगवाव्यात हा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. 

तालुक्‍यात मोसंबी, पेरू, केळी, सिताफळ, पपई व डाळिंबाच्या फळबागा आहेत. त्यातील अनेक फळबागा आता पाण्याअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही फळबागांचे २०१२ च्या भीषण दुष्काळात सरपण झाले आहे. उरल्यासुरल्या फळबागाही अत्यल्प पावसामुळे संकटात आहेत.यावर्षी कमी पाऊस झाल्याने काही भागांतील विहीरी तळाशी गेल्या आहेत. पाच वर्षांपासून सलग पाणी टंचाईची झळ सोसावी लागत असल्याने यंदाही बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वर्षानुवर्षे सांभाळ केलेल्या लाखमोलाच्या फळबागा वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला असून, दोन हजार लिटर पाण्याच्या टॅंकरसाठी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक भागांतील फळबागांची स्थिती चिंताजनक असल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे.  

फळबाग उत्पादक हवालदिल
मागील चार वर्षांत पाण्याअभावी डाळिंब, पपई, मोसंबीच्या बागा जळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकेकाळी हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता पाण्याअभावी जळताना पाहून शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. शेकडो शेतकरी फळबागा जगविण्यासाठी मोठा खर्च करीत आहेत. हा खर्च भागविण्यासाठी बॅंकेचे कर्ज, खासगी कर्ज, उसणवारी, सोनेतारण किंवा विकून गरज भागवली जात आहे.

साधारण १२ वर्षांपूर्वी दीड एकरात पेरूंच्या ९० झाडांची लागवड केली. सुरवातीला ३ ते ४ वर्षं अपेक्षित उत्पन्न मिळाले. मात्र, पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. विहीर आटल्याने सध्या विकतचे पाणी घेऊन झाडांना जगवावे लागत आहे. त्यामुळे झाडे हिरवी दिसत असली, तरी फळे रोगराईमुळे खराब होत आहेत. शिवाय फळांची वाढ होत नसल्याने उत्पादनात घट होत आहे. 
- शालिक दादाराव पारवे, शेतकरी, मनापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com