सभागृह नेत्यांनी गुंडाळला महापौरांचा विषय!

सभागृह नेत्यांनी गुंडाळला महापौरांचा विषय!

लातूर - महापालिकेत सोमवारी झालेली विशेष सर्वसाधारण सभा चर्चा न होताच गुंडाळली गेली. महापौर सुरेश पवार यांनी सोमवारी (ता. २०) गुंठेवारीच्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सत्ताधारी व विरोधक सभेला उपस्थित होते. पण महापौर सुरेश पवार यांनी आणलेला हा विषय भाजपचे सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी माहिती अर्धवट असल्याचे कारण पुढे करीत गुंडाळला. या विषयावर चर्चा न होताच अवघ्या पाच मिनिटांतच या महत्त्वाच्या विषयावरची सभा संपली. सभेनंतर काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ घातला. महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नंतर महापौरांना गाजरे भेट देऊन निषेध केला. 

महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ गुंठेवारी विकास नियमाधीन करण्यास मुदतवाढ देणे हा आजच्या विशेष सर्वसाधारण सभेचा विषय होता. या विषयावर महापौर सुरेश पवार यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. महापौर पवार, उपमहापौर देविदास काळे उपस्थित होते. आयुक्त अच्युत हांगे हे कार्यालयीन कामकाजासाठी मुंबईला गेले आहेत. उपायुक्त मिनीनाथ दंडवते रजेवर आहेत. त्यामुळे श्री. हांगे यांनी अतिरिक्त पदभार असलेले उपायुक्त सतीश शिवणे यांना प्राधिकृत केले होते. तेही वेळेवर उपस्थित होते. सभा सुरू होण्यापूर्वी नगरसेवक राजा मणियार यांनी अमृत योजनेच्या विषयावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे काय झाले, असा प्रश्न  महापौरांना केला. त्यावरही सभा घेतली जाईल, असे श्री. पवार यांनी उत्तर दिल्यानंतर श्री. मणियार खाली बसले. त्यानंतर नगरसचिवांनी गुंठेवारी विषयाचे वाचन केले. त्यानंतर तातडीने भाजपचे सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी या विषयाची अर्धवट माहिती असून ही सभाच होऊ शकत नाही. ती नंतर घ्यावी, असे सांगितले. त्यानंतर शैलेश स्वामींनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर सुरेश पवार यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. 

अवघ्या पाच मिनिटांत या घडामोडी घडल्यानंतर विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ यांनी महापौरांकडे धाव घेतली. त्यांच्यासमोरील माईक हातात घेऊन ते आक्रमक झाले. त्यांच्यासोबतच स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर व इतर काँग्रेसचे सदस्यही आक्रमक झाले. अशा गोंधळातच ही सभा गुंडाळण्यात आली. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक श्री. सूळ, सचिन बंडापल्ले, युनूस मोमीन, कैलास कांबळे, रविशंकर जाधव आदींनी महापौरांना गाजरे भेट देत निषेध व्यक्त केला. 

गुंठेवारीच्या विषयावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभागृहात अनेक नवीन नगरसेवक आहेत. त्यांना गुंठेवारीचा विषय माहीत नाही. त्यात प्रशासनाने अर्धवट माहिती दिली होती. ही बाब श्री. गोजमगुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने इत्थंभूत माहिती घेऊन पुन्हा प्रस्ताव आणावा नंतर सभा घेतली जाईल. काँग्रेसच्या नगरसेवकांकडून होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत.
- सुरेश पवार, महापौर.

महापौरांची अंतर्गत गोची करण्याचा हा प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांनीच सभा बोलावली व त्यांनीच गुंडाळली हे पहिल्यांदा घडत आहे. या माध्यमातून बिल्डर्सना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होण्याची भीती आहे. ही हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. आम्ही पुन्हा हा विषय आणू. लोकांना पैसे द्यावे लागणार नाहीत.
- ॲड. दीपक सूळ, विरोधी पक्षनेता

भाजपमध्ये उघड गटबाजी दिसत आहे. महापौरांच्या विरोधात सभागृह नेता आहे. पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. विषयाच्या ‘टिप्पणी’पेक्षा ‘टीप’ आली नाही म्हणून सभा गुंडाळली. आम्ही विशेष सभेची मागणी करणार आहोत.
- अशोक गोविंदपूरकर, सभापती, स्थायी समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com