दोघांचे अपहरण, एकाचा खून 

दोघांचे अपहरण, एकाचा खून 

आष्टी - नातेवाईक असणाऱ्या 20 ते 25 जणांच्या जमावाने कासारी शिवारातील भोसले वस्तीवर येऊन बेदम मारहाण करून दोघांचे अपहरण केले. चुंबळी फाटा (ता. जामखेड) येथे नेऊन यातील एकाचा खून केला, तर दुसरा जखमी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला. या घटनेने मृताच्या नातेवाइकांनी आष्टी पोलिसांवर रोष व्यक्त करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणावाचे वातावरण होते. 

कासारी शिवारात राहत असलेल्या भरत अब्दुल्ला भोसले व त्यांचा भाऊ नायलान अब्दुल्ला भोसले या दोघांसह त्यांच्या कुटुंबीयांवर शुक्रवारी (ता. 14) रात्री नऊच्या सुमारास 20 ते 25 जणांनी प्राणघातक हल्ला केला. नायलान भोसले व भरत भोसले यांचे अपहरण केले. यापैकी भरत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरले. मात्र, नायलान भोसले यांना जामखेड तालुक्‍यातील चुंबळी येथे नेऊन अपहरणकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे चुंबळी शिवारात त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला. 

शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जामखेड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, आष्टी पोलिसांत भरत भोसले यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्‍यातील घोडेगाव येथील लाल्या शिद्या काळे व इतर 17 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मृत नायलानचा भाऊ बबन अब्दुल्ला भोसले व भावजय छाया बबन भोसले यांचा समावेश आहे. 

पोलिसांचे दुर्लक्ष 
शुक्रवारी झालेल्या हल्ल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आष्टी पोलिसांना कळविली; मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने अपहरणकर्ते पळून गेले. बीट अंमलदारांना अनेकवेळा संपर्क करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. नायलानच्या नातेवाइकांनी हे आरोपी घोडेगाव (ता. जामखेड) येथील असल्याचे सांगूनही पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. 

शनिवारी दुपारपर्यंतही पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही. जामखेड पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांत कळविल्यानंतर आष्टीची पोलिस यंत्रणा जागी झाली व मृत नायलानच्या घरी जाऊन पोलिसांनी नातेवाइकांसह जामखेड येथे जाऊन मृतदेहाची ओळख पटविली. मात्र, आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन सर्वच नातेवाईक आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाइकांजवळ एकत्र जमले. शासकीय रुग्णालयात जखमींना भेटण्यासाठी माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी भेट दिली असता त्यांनी आष्टी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नायलानचा खून झाल्याची कैफियत मांडली. 

दोन पथके रवाना 
जामखेडच्या आकस्मिक मृत्यू आणि आष्टी येथील दाखल मारहाण, अपहरण या गुन्ह्यांचे खुनाच्या गुन्ह्यात रूपांतर झाले असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. आष्टीचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर, एन. एम. शेख यांची कर्मचाऱ्यांसह दोन पथके आरोपींना पकडण्यासाठी रवाना केली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com