पोलिस अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मिटला मोगरग्याचा वाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औसा - मोगरगा (ता. औसा) येथे गेल्या काही दिवसांपासून दलित आणि सवर्णांमधील वादामुळे तणावाचे वातावरण होते. पोलिसांच्या मध्यस्थीने या वादाला पूर्णविराम मिळाला असून, शुक्रवारी (ता.२०) प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे आणि औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या उपस्थितीत गावातील दलित व सवर्णांनी एकत्र येत गळाभेट घेऊन पुन्हा गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याचा निर्धार केला. 

मोगरगा (ता. औसा) येथील दलित आणि सवर्णांतील वाद विकोपाला गेला होता. १ मे २०१७ रोजी २६ जणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी पुन्हा पाच जणांवर गुन्हे दाखल झाले. गावातील सवर्ण आम्हाला वाळीत टाकतात म्हणून येथील दलित समाजाच्या महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी आणि तहसील प्रशासन, पंचायत समितीने हा वाद मिटविण्यासाठी वारंवार मध्यस्थी केली होती; परंतु त्याला म्हणावे तसे यश येत नव्हते. गावातील दोन समाजांतील बिघडलेले संबंध सुरळीत करण्यासाठी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी शिष्टाई सुरू केली आणि शुक्रवारी (ता. २०) पाडव्याच्या मुहूर्तावर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांना सोबत घेत, फटाके, मिठाई असे साहित्य घेऊन मोगरगा गाठले. येथील खंडोबा मंदिरात दोन्ही समाजांतील महिला, पुरुषांना एकत्र आणत पोलिसांनी गावाच्या एकतेचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले. ही गोष्ट सर्वांनाच पटल्याने दलित व सवर्ण पुरुषांनी एकमेकांची गळाभेट घेत गैरसमजामुळे आलेला दुरावा आपण मिटवत असल्याच्या भावना बोलून दाखविल्या. दलित समाजातील महिलांनी सवर्ण समाजातील पुरुषांना ओवाळले. मोगरग्यातील हा वाद दिवाळीच्या पाडव्याला संपुष्टात आला. या कामामध्ये पोलिसांनी केवळ कायद्याचा धाक न दाखविता जी मनोमिलनाची शिष्टाई केली ती खरेच या गावाला एका वेगळ्या वळणावर घेऊन गेली. किल्लारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मोहन भोसले, औशाचे उत्तम चक्रे आणि पोलिसांची यावेळी उपस्थिती होती.