उत्तराखंडमध्ये अडकलेले मराठवाड्यातील भाविक परतीकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

औरंगाबाद - उत्तराखंड येथील भूस्खलनात अडकलेले यात्रेकरू शनिवारी (ता. 20) परतीकडे निघाले. बद्रीनाथ मार्गात कोसळलेली दरड दूर करून रस्ता खुला करण्यात आला असून, गोविंदघाट येथून प्रथम छोटी चारचाकी वाहने पुढे सोडण्यास सुरवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत बस आणि मोठ्या अवजड वाहनांनाही वाहतूक मोकळी करून देण्यात येणार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद - उत्तराखंड येथील भूस्खलनात अडकलेले यात्रेकरू शनिवारी (ता. 20) परतीकडे निघाले. बद्रीनाथ मार्गात कोसळलेली दरड दूर करून रस्ता खुला करण्यात आला असून, गोविंदघाट येथून प्रथम छोटी चारचाकी वाहने पुढे सोडण्यास सुरवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत बस आणि मोठ्या अवजड वाहनांनाही वाहतूक मोकळी करून देण्यात येणार असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने 10 ते 15 हजार यात्रेकरू अडकले. यात मराठवाड्यातील सुमारे साडेतीनशे यात्रेकरू आहेत. औरंगाबादचे सुमारे सव्वाशे भाविक सुखरूप असून, रस्त्यावरील मलबा हटवून शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वाहतूक खुली झाल्याने ते टप्प्याटप्प्याने परतीकडे निघत असल्याची माहिती हेरंब टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मंगेश कपोते यांनी दिली. बद्रीनाथमधून पिपलकोठीकडे कार सोडण्यास सुरवात झाली असली, तरी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस अद्याप सोडण्यात आलेल्या नाहीत. रविवारी दुपारपर्यंत महामार्ग खुला होईल. रात्री या भागात पाऊस सुरू झाला.

स्थानिक गुरुद्वाराने जेवणाची व्यवस्था केल्यामुळे मोठी सोय झाली. मात्र, हॉटेल्समध्ये एरवी पाचशे रुपयांना मिळणारी खोली तब्बल सात हजारांना दिली जात असल्याचे श्री. कपोते यांनी सांगितले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी हे सतत यात्रेकरूंच्या संपर्कात आहेत.

सिल्लोड, फुलंब्रीचे भाविक रविवारी सकाळी निघणार
घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथील ओम बाबाजी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये चार कर्मचाऱ्यांसह 55 यात्रेकरू गेले आहेत. कंपनीचे संचालक मनोहर पंडित यांनी सर्वजण सुखरूप असल्याचे सांगितले. यात देऊळगाव बाजार (ता. सिल्लोड) येथील सहा, वाघलगाव (ता. फुलंब्री) येथील 32, भराडी पारधी (ता. जामनेर) येथील सहा, संगमनेर (ता. संगमनेर) येथील चार, परळी (ता. परळी) येथील तीन यात्रेकरूंचा समावेश आहे. स्थानिक नगर परिषदेने एका शाळेत त्यांची व्यवस्था केली आहे. रस्ता सुरू होताच रविवारी पहाटे काही जण बद्रीनाथ दर्शनासाठी निघून नंतर परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले.

हिंगोलीचे जिल्हाधिकारी भाविकांच्या संपर्कात
हिंगोलीतून बद्रीनाथ दर्शनासाठी गेलेले भाविक विष्णुप्रयागजवळ अडकून पडले आहेत. तेथील जोशीमठातील कालीकमलीवाली धर्मशाळेच्या आश्रयाने भाविक सुखरूप असून, जिल्हाधिकारी अनिल भंडारी त्यांच्या संपर्कात आहेत. हिंगोली तालुक्‍यातील वीस गावांतील भाविक पाच मे रोजी साईबाबा ट्रॅव्हल्सद्वारे बद्रीनाथाच्या दर्शनासाठी निघाले होते.

परभणीचे 56 यात्रेकरू सुखरूप
परभणीच्या 56 यात्रेकरूंशी संपर्क झाला असून, ते सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हरिहर पत्की यांनी दिली. तीन यात्रा कंपन्यांकडून हे भाविक सहा ते 31 मेदरम्यान उत्तर भारतात यात्रेसाठी गेले आहेत. जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी शनिवारी याचा आढावा घेतला.

बीडचे यात्रेकरू परतीच्या मार्गावर
अंबाजोगाई व परळी तालुक्‍यांतील सातही भाविक सुखरूप व संपर्कात असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी म्हणाले. एका खासगी जीपने गेलेले हे भाविक शनिवारी संध्याकाळी परतीच्या मार्गाला निघाले. पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपत्कालीन केंद्रातून यात्रेकरूंची विचारपूस केली.

सहा जणांचा माग लागेना
हत्ती पर्वत येथे लातूरचे 16 यात्रेकरू अडकले. मात्र याच भागात गेलेल्या जिल्ह्यातील आणखी सहा यात्रेकरूंशी संपर्क होत नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली. दहा मे रोजी हे लोक रेल्वेने बद्रीनाथ यात्रेसाठी गेले. संबंधित यात्रेकरू, त्यांचे मोबाईल क्रमांक व त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क क्रमांक विष्णुप्रयाग आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवल्याचे डॉ. गव्हाणे म्हणाले.

सतीश चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटले
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांना राज्य शासनाने योग्य ती मदत व सहकार्य करावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शनिवारी (ता. 20) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. राज्य शासन भाविकांच्या मदतीसाठी तत्पर असून, राज्यातील भाविकांना रेल्वेने परत आणण्याची व्यवस्था केल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

सर्व प्रवासी सुरक्षित असून, प्रशासनातर्फे सर्वांशी संपर्क साधण्यात आला आहे. आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत आम्ही शक्‍य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.
- नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, औरंगाबाद.

खासदार खैरे धावले विमान प्रवाशांच्या मदतीला
अडकलेले प्रवासी विमानाच्या नियोजित वेळेत पोहचू शकत नसल्याने त्यांची तिकिटे बाद होणार होती; मात्र ही अडचण लक्षात घेऊन खासदार चंद्रकांत खैरे यांनी 22 यात्रेकरूंची तिकिटे रविवारऐवजी सोमवारच्या विमानात सामावून घेण्यासाठी मध्यस्थी केली. यामुळे कोणताही आर्थिक फटका न बसता हे यात्रेकरू सुखरूप आपापल्या घरी पोहोचू शकणार आहेत. खासदार खैरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे उत्तराखंड राज्यप्रमुख गौरव कुमार यांनीही चमोलीच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतीसाठी पुढाकार घेतला.

शहरातील सव्वाशेपैकी 22 यात्रेकरू रविवारी (ता. 21) सकाळी आठला दिल्ली विमानतळाहून औरंगाबादकडे झेपावणार होते; मात्र भूस्खलनामुळे दोन दिवस अडकून पडलेल्या या 22 जणांची तिकिटे बाद होण्याची शक्‍यता निर्माण झाली. रविवारऐवजी (ता. 21) सोमवारच्या (ता.22) विमानात त्यांना सामावून घेण्याचा पर्याय खासदार खैरे यांनी विमान कंपनीला सुचवला. कंपनीने तो मंजूर केल्याने प्रवाशांचे हजारो रुपये वाचले. नियोजित वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था शिवसेनेतर्फे दिल्लीत खासदार निवासात करण्यात येणार असल्याचे श्री. खैरे म्हणाले.

औरंगाबाद - 172
बीड - 7
लातूर - 16
हिंगोली - 120
परभणी - 56