धावत्या कारमध्ये मार्केटींग प्रतिनिधीचा खून!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

औरंगाबाद - हर्बल उत्पादनाची मार्केटींग करणाऱ्या तरुणावर धावत्या कारमध्येच चाकूने सपासप वार केले. त्यानंतर निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास उघड झाली. दरम्यान, आत्महत्या भासविण्यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह केंब्रिज येथील साईमंदिरालगतच्या रेल्वेरूळावर टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद - हर्बल उत्पादनाची मार्केटींग करणाऱ्या तरुणावर धावत्या कारमध्येच चाकूने सपासप वार केले. त्यानंतर निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास उघड झाली. दरम्यान, आत्महत्या भासविण्यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह केंब्रिज येथील साईमंदिरालगतच्या रेल्वेरूळावर टाकून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

अमोल मुरलीधर साबळे (वय 32, रा. मूळ वडखा, ता. औरंगाबाद, ह. मु. ब्रिजवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. बी.ए.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर अमोल मार्केटींग क्षेत्रात कार्यरत होता. दीड वर्षांपासून तो हर्बल उत्पादनाची मार्केटींग करीत होता. 2007 ला त्याचा विवाह झाला. त्याला आठ वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलगा असून आई-वडील वडखा गावी शेती करतात.

गुरुवारी (ता.12) सकाळी दहाच्या सुमारास अमोल त्याच्या शेवरोलेट कारने व्यवसायासाठी ब्रिजवाडी येथून निघाला. सायंकाळपर्यंत काम केल्यानंतर त्याला पत्नी वैशालीचा फोन आला. मुलांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी येण्याबाबत विचारणा करून तिने फोन ठेवला. पण, तो कार्यक्रमालाच नव्हे तर रात्री घरीसुद्धा परतला नाही. दुसऱ्या दिवशी पत्नीने त्याला संपर्क साधला, पण उत्तर मिळाले नाही. दरम्यान, साईमंदिरालगत रेल्वेरुळावर मृतदेह सापडल्याची बाब चिकलठाणा पोलिसांना समजली.

त्यानंतर घटनास्थळी पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर, उपविभागीय अधिकारी सुनील लांजेवार, निरीक्षक चतुर्भुज काकडे, उपनिरीक्षक मीना तुपे पथकासह पोचल्या. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कारची झडती घेतली. कारमध्ये कटर, दारूच्या रिकाम्या बाटल्या, बॉटलमध्ये पाणीमिश्रित दारू, दोन ड्रेस सापडले. दरम्यान श्‍वानपथक, ठसेतज्ञ व फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले. त्यांनी मातीमिश्रित रक्ताचे नमुने व अन्य पुरावे गोळा केले.

कारमुळे पटली ओळख
घटनास्थळी कार उभी होती. कारच्या क्रमांकावरून आरटीओ कार्यालयातून माहिती घेत मृताचा पत्ता पोलिसांनी शोधला. अमोलच्या मावसभावाला संपर्क करून बोलावण्यात आले. अमोलचे भाऊ घटनास्थळी पोचल्यानंतर अमोलच्या कपड्यावरून तसेच कारवरून अमोलचाच मृतदेह असल्याची ओळख पटली. यानंतर चिकलठाणा पोलिसांनी मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी नेला.

तीन तासांनंतर खुनाची बाब उघड
फुलविक्रेत्याने मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर चिकलठाणा पोलिस घटनास्थळी पोचले. रेल्वेकटींग समजून छिन्नविच्छिन्न मृतदेहाचे तुकडे गोळा केले. यात तीन तास गेले, पण गळ्यावरील वार व घटनास्थळावरील कारमध्ये रक्‍त सांडल्यामुळे खून झाल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: marketing leader murder in car