माध्यमांनी समाजाला एकजूट ठेवावे - गोपाळ साक्रीकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

औरगाबाद - तरुण पिढीने आजच्या प्रश्‍नांची, वातावरणाची दखल घेत त्याची मांडणी करण्यासाठी स्वत:ला समर्थ करावे. वेगवेगळ्या पद्धतीने विखुरल्या जाणाऱ्या समाजाला एकजूट ठेवण्याचे काम माध्यमांनी करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांनी व्यक्‍त येथे केली. 

औरगाबाद - तरुण पिढीने आजच्या प्रश्‍नांची, वातावरणाची दखल घेत त्याची मांडणी करण्यासाठी स्वत:ला समर्थ करावे. वेगवेगळ्या पद्धतीने विखुरल्या जाणाऱ्या समाजाला एकजूट ठेवण्याचे काम माध्यमांनी करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांनी व्यक्‍त येथे केली. 

पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा "अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पुरस्कार' बुधवारी (ता. 29) मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात श्री. साक्रीकर यांना; तर युवा पत्रकारिता पुरस्कार मुक्‍त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांना विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

पुरस्काराला उत्तर देताना श्री. साक्रीकर म्हणाले, वैद्य यांनी आक्रमक लेखन केले. एकदा तर पोलिस अधिकाऱ्यांनी उल्लेख केला की, तुम्ही पेटते गोळे फेकता म्हणून समाज पेटतो, अशी ती पत्रकारिता होती; मात्र त्याचबरोबर वाचकांना हवी असलेली क्रिकेट, सिनेमा अशाप्रकारची विविधता देण्याचे कामही त्यांनी केले. त्यांना बातमीची नाडी अचूक सापडायची म्हणून आपण त्यांना "खडीवालें'च्या धर्तीवर "नाडीवाले वैद्य'ही म्हणायचो असे सांगत त्यांनी वैद्य यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. आज प्रश्‍न तेच असून केवळ त्याचे स्वरूप बदलले असले तरी त्याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे असे ते म्हणाले. 

डॉ. भापकर म्हणाले की येथील चळवळीमुळेच प्रशासनाला, राज्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना दिशा मिळाली. चुकीच्यापद्धतीने कामे करणाऱ्यांना वेसण घालण्याचे काम माध्यमे करतात. तसेच माध्यमांनी चुका दाखविल्यानंतर त्यातून शिकण्याची तयारी हवी. 

सध्याचा विस्कटलेला काळ असून सत्य वेगाने प्रदूषित होत असताना इथे प्रत्येकजण आपापली जात, धर्म, अस्मितेमध्ये गुरफटत आहे. अशावेळी मूळ गाभा जाणून घेणे अवघड होत असून अशा प्रसंगांना कसे हाताळायचे, असे अनेक प्रश्‍न शर्मिष्ठा भोसले यांनी मनोगतात उपस्थित केले. 

प्रा. फ. मुं. शिंदे म्हणाले, वैद्य यांच्या नावाने दिला जाणारा हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार आहे. एका भूमिकेतून कार्यरत पत्रकारितेतील श्रेष्ठीचा अशा पुरस्काराने गौरव केला जात आहे. श्री. साक्रीकर हे प्रतिभा असलेले, दृष्टिकोन बाळगून समाजाकडे बारकाईने पाहणारे पत्रकार आहेत. समभावाने वागणूक देताना त्यांच्या प्रेमात आणि रागातही आत्मीयता असते. केवळ व्यासंगाचे व्यसन असलेला पत्रकार असे साक्रीकरांचे वर्णन करीत प्रा. शिंदे यांनी त्यांच्या शैलीत विविध प्रसंग सांगून सभागृहात हास्य फुलवले. 

प्रारंभी वैद्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार, दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. पाहुण्यांचे स्वागत संजय वरकड यांनी केले. प्रास्ताविक प्रमोद माने यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. धनंजय लांबे यांनी आभार मानले. 

Web Title: The media should be united community - Gopal sakrikar