मध्यम मालवाहू वाहनांना दिवसा शहरात 'नो एंट्री'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

औरंगाबाद - जड वाहतुकीला शहराबाहेरचा मार्ग दाखवणाऱ्या पोलिस आयुक्तांनी आता मध्यम मालवाहू वाहनांनाही शहरात दिवसा "नो एंट्री' केली आहे. यासंदर्भात आदेशच त्यांनी दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

औरंगाबाद - जड वाहतुकीला शहराबाहेरचा मार्ग दाखवणाऱ्या पोलिस आयुक्तांनी आता मध्यम मालवाहू वाहनांनाही शहरात दिवसा "नो एंट्री' केली आहे. यासंदर्भात आदेशच त्यांनी दिले असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

पोलिस विभागाने काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे, की शहरातील लोकांना धोका, अडथळा व त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाय योजण्यात आले आहेत. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी शहरात येणाऱ्या मध्यम मालवाहू वाहनांचे वाहतूक नियमन करणे आवश्‍यक असल्याची खात्री पोलिस आयुक्तांची झाली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार, "नो एंट्री'चा मार्ग मध्यम मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दाखवला आहे. या आदेशामुळे सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत वाहतूक करण्यास बंदी आहे. आयशर, टेम्पोसह साडेसातशे ते बाराशे भारमानाची मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा यात समावेश आहे. महिन्यापूर्वी हे आदेश जारी झाले असून यावर पोलिस विभागाने आक्षेपही मागवले होते; परंतु या अधिसूचनेवर कोणतेही आक्षेप व हरकती आल्या नसल्याचा दावा पोलिस विभागाने केला. त्यामुळे या अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अशी वळवली वाहतूक

  • पुणे- नगरकडून येणारी मध्यम मालवाहू वाहने पैठण लिंक रोड- महानुभाव चौक- बीड बायपासमार्गे जातील.
  • वैजापूर- धुळेकडून येणारी मध्यम मालवाहू वाहने नगरनाका- वाळूज रस्ता- पैठण लिंकरोड - महानुभाव चौक- बीड बायपासमार्गे जातील.
  • जालन्याकडून येणारी व पुणे- नगर- वैजापूर- धुळ्याकडे जाणारी मध्यम मालवाहू वाहने केंब्रिज स्कूलसमोरून बीड बायपास - झाल्टा फाटा - महानुभाव चौकी ते पैठण लिंक रोडमार्गे जातील.
  • जालन्याकडून येणारी व जळगावकडून जाणारी वाहने मध्यम मालवाहू वाहने केंब्रिज स्कूलसमोरून सावंगी- नवीन बायपासमार्गे जातील.
  • जळगाव रोडकडून येणारी मध्यम मालवाहू वाहने सावंगी नवीन बायपास रोडने केंब्रिज स्कूलसमोरील जालना रोडने व बीड बायपासमार्गे पुढे जातील.