एमआयएम ठरला मनसे, बसपपेक्षा मोठा पक्ष 

एमआयएम ठरला मनसे, बसपपेक्षा मोठा पक्ष 

औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या पक्षाने दखल घेण्याइतपत कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे मनसे, बहुजन समाज पक्षांपेक्षा एमआयएम हा मोठा पक्ष ठरला आहे. मोजक्‍याच मुस्लिम, दलित बहुल जागांवर लक्ष केंद्रित करण्याची खेळी यावेळीही यशस्वी ठरल्याचे दिसते. एमआयएमच्या उमेदवारांचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांना बसला आहे. 

25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या आणि दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी एमआयएमने सावध भूमिका घेत मोजक्‍याच ठिकाणी आपले उमेदवार दिले. औरंगाबाद जिल्हा परिषदेत आठ गट, तर 20 गणांत उमेदवार दिले होते; मात्र सर्वच प्रमुख पक्ष मैदानात असल्याने एमआयएमच्या उमेदवारांचा सुफडा साफ झाला. राज्यात कुठेही जिल्हा परिषदेत यश मिळाले नाही. राज्यातील नगरपालिका निवडणुकीत एमआयएमने मोजक्‍याच जागा लढवून जवळपास 60 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये त्यांच्या उमरखेड 8, शहादा 4, मलकापूर 4, अंजनगाव सुर्जी 3, शेवगाव 2, मंगरूळपीर, दर्यापूर 2, बीड 9, उदगीर, कन्नड येथील नगरपालिकेच्या जागांचा समावेश होता. यानंतर त्यांनी सर्वाधिक लक्ष मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला, अमरावती महापालिकेवर केंद्रित केले होते. ठराविक मुस्लिम, दलितबहुल वॉर्डात उमेदवार दिले. त्यामध्ये मुंबईत- 2, ठाणे- 2, उल्हासनगर- 1, पुणे, सोलापूर- 9, अकोला- 1, अमरावती- 10 अशा 25 जागा जिंकल्या आहेत. विशेष राज्यात भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीनंतर दहा महापालिकेत एमआयएमने 25 जागा जिंकल्या आहेत. एमआयएम मनसे, बहुजन समाज पक्षा पेक्षा जास्त जागा जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. मनसेचे दहा महापालिकेत 15, बहुजन समाज पक्षाचे 19, समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक विजयी झालेले आहेत. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी मतांचा फटका 
नेहमीच्या निवडणुकीप्रमाणे एमआयएमचा सर्वाधिक फटका हा कॉंग्रेस, राष्ट्रवादीला बसला आहे. ज्या ठिकाणाहून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होते, अशा जास्तीत जास्त जागा एमआयएमने आपल्याकडे खेचल्या आहेत; तसेच ज्या ठिकाणी एमआयएमने उमेदवार दिले तेथे दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहे. सर्वाधिक फटका हा मुंबई, सोलापूर, अमरावती, अकोला दोन्ही कॉंग्रेसला बसला आहे. पहिल्यांदाच या दहा महापालिकांच्या निवडणुकीत उडी घेत एमआएमने 25 जागा जिंकल्याने राष्ट्रवादी, कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com