'एमआयएम'ची राज्याची कोअर कमिटी बरखास्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

औरंगाबाद - महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षात झालेली गटबाजी, पक्षाच्या नेत्यांवरील "सेटिंग'चे आरोप, अपेक्षित जागा न जिंकणे या प्रकारांची गंभीर दखल "ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी घेतली असून, महाराष्ट्रातील पक्षाची नऊ सदस्यांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती, असे स्पष्टीकरण ओवेसींनी आपल्या पत्रात दिले आहे.

"एआयएमआयएम'ने राज्यात 9 सदस्यांची कोअर कमिटी तयार केली होती. या कमिटीच्या अध्यक्षपदी नांदेड येथील सय्यद मोईन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर यामध्ये सर्वाधिक तीन सदस्य डॉ. गफ्फार कादरी, मौलाना महेफुजउर्र रहेमान, पंडित बोर्डे हे औरंगाबादचे होते; तसेच यामध्ये लातूर, नागपूर आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान देण्यात आले होते. या कमिटीने राज्यभर दौरे करून जिल्हा, तालुका समित्या स्थापन केल्या होत्या; मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यामुळे ओवेसींनी हा निर्णय घेतल्याची पक्षवर्तुळात चर्चा आहे.

Web Title: mim core committee dismissed