"एमआयएम'चे आता महापालिकेवर लक्ष 

27dec16-latur
27dec16-latur

लातूर - उदगीर नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन लातूर महापालिकेतील सर्व जागा लढविण्यात येणार आहेत. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकादेखील लढविण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांचे भूत दाखवून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुस्लिमांचा केवळ मतांसाठी वापर केला, अशी टीका या पक्षाचे जिल्हाध्यक्ष ताहेर सय्यद यांनी सोमवारी (ता. 26) येथे पत्रकार परिषदेत केली. 

उदगीर पालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम, दलित व ओबीसी एकत्र आणून उदगीर विकास आघाडी तयार केली. हा आमचा पहिला अनुभव होता. पण उदगीरकरांनी आमच्यावर विश्वास दाखविला. नगराध्यक्षपदाचा आमचा उमेदवार सहा-सात फेऱ्या आघाडीवर राहिला. आम्ही सहा जागा जिंकल्या. दोन उमेदवार केवळ 50 मतांच्या फरकाने पराभूत झाले. तर सात उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. परिवर्तनाची ही लढाई होती. 37 वर्षांची सत्ता उलथून टाकण्यास आम्हाला यश आले आहे. तोच फॉर्म्युला आता लातूर महापालिकेच्या व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत वापरण्यात येणार आहे, असे श्री. सय्यद म्हणाले. 

मुस्लिम समाजाच्या दुरवस्थेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस जबाबदार आहेत. त्यांनी आमच्यासमोर भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे भूत उभे केले. त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे, असे सांगत राहिले. केवळ मतांसाठी वापर केला. एमआयएमच्या रूपाने एक पक्ष आता समोर आला आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन हा पक्ष काम करीत आहे. सत्तेवर असलेली घराणेशाही दूर करून बहुजनांच्या हातात सत्ता देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता आमच्या पक्षाच्या पाठीमागे भाजप आहे, असे कॉंग्रेसवाले सांगत आहेत. आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे श्री. सय्यद म्हणाले. 

दलित मुस्लिमांच्या समस्या सारख्या आहेत. यातूनच उदगीरमध्ये आम्ही एकत्र आलो. त्यामुळे हे मिशन यशस्वी झाले. आता महापालिकेचे मिशन आहे. 15 संघटनांशी चर्चा झाली आहे. लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उदगीर विकास आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रभाकर काळे यांनी दिली. यावेळी अब्दुल कुरेशी, बरकत काजी, अन्वर सय्यद आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com