राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवडीस आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

औरंगाबाद - जालना येथील शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. मंगळवारी (ता.7) या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद - जालना येथील शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. मंगळवारी (ता.7) या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.

जालना विधानसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत शेख चॉंद पाशा शेख जानी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज अपूर्ण असल्याने तो फेटाळला होता. नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 27 सप्टेंबर 2014 पर्यंत शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, शपथपत्र दाखल करूनही त्यांचा अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे त्यांनी खंडपीठात धाव घेतली होती.

निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला होता. तसेच निवडणुकीनंतर आव्हान याचिका दाखल करण्यास मुभा दिली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार खोतकर विजयी झाले. म्हणून शेख चॉंद यांनी त्यांच्या निवडीस खंडपीठात आव्हान दिले आहे. ही निवड रद्द करण्याची विनंती याचिकेत केली आहे.

माजी आमदार कैलास गोरंट्याल, विजय चौधरी यांनीही खोतकर यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केलेल्या असून, या सर्वांची एकत्रित सुनावणी सुरू आहे.

खोतकर यांनी उमेदवारी अर्ज मुदतीत म्हणजे दुपारी तीनच्या आत दिले नसल्याचे गोरंट्याल यांच्या याचिकेत म्हटले आहे. प्रकरणात साक्षी-पुरावा सुरू असून, गोरंट्याल यांचा साक्षी-पुरावा पूर्ण झाला आहे. इतर याचिकाकर्ते मुद्दे मांडणार आहेत. उद्या यावर सुनावणी होणार आहे.

Web Title: Minister Arjun khotakars selection challenge