आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष सक्तमजुरी 

h-jadhav
h-jadhav

औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी घातल्यानंतर पोलिसांना मारहाण केल्याविषयीच्या प्रकरणात आमदार हर्षवर्धन जाधव यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी दोन कलमान्वये प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. 

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ता.5 जानेवारी 2011 ला वेरुळ लेण्यांना भेट देण्यासाठी आणि वेरुळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिस बंदोबस्त तैनात केलेला होता. त्यावेळचे हे प्रकरण आहे. 

या प्रकरणात सादर दोषारोपपत्रातील माहितीनुसार ः त्यावेळी विरेगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे खुलताबाद ईदगाह टी पॉइंटजवळ वाहतूक नियमन करत होते. मुख्यमंत्री वेरुळ लेणी पाहून पर्यटन केंद्राकडे निघाल्याने टी पाइंटजवळ वाहतूक थांबविण्यात आलेली होती. दरम्यान, औरंगाबादकडून एक मोटार आली. ही गाडी स्वत: आमदार हर्षवर्धन जाधव चालवत होते. गाडीमध्ये तत्कालीन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील बनकर व वाहनचालक संतोष जाधव हे बसलेले होते. पोलिसांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र आमदार जाधव यांनी गाडी न थांबवता सहायक पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप होता, मात्र प्रसंगावधान राखत कोकणे यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेऊन जीव वाचवला. त्यानंतर सुसाट वेगाने आमदार जाधव हे वेरुळच्या दिशेने निघाले, कोकणे यांनी तातडीने वायरलेसवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यांचा पाठलाग सुरू केला. पुढे वेरुळ लेणीसमोरील महावीर स्तंभाजवळ दुसऱ्या अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांची गाडी अडवली. पाठलाग करणारे सहायक निरीक्षक कोकणे हेही लगेचच त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी गाडीतून उतरत आमदार जाधव यांनी मी आमदार आहे, ओळखत नाही काय, असे म्हणत शिवीगाळ करीत सहायक निरीक्षक कोकणे यांना मारहाण केली, मध्यस्थीचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी कोकणे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे, गंभीर जखमी करणे, विनयभंग करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. 

या प्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास करून 10 मार्च 2011 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील अरविंद बागूल यांनी नऊ जणांच्या साक्ष नोंदवल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरून कलम 252 (शासकीय कामात अडथळा निर्माण करणे) या कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व कलम 323 (शासकीय कर्मचाऱ्याला जखमी करणे) या कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगायच्या आहेत. न्यायालयाने दिलीप पाटील बनकर व संतोष जाधव यांना निर्दोष मुक्त केले. शिक्षा सुनावल्यानंतर आमदार जाधव यांनी तात्काळ दंडाची दहा हजारांची रक्कम भरली, त्यानंतर न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वेळ म्हणून शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com