चंद्रकांत पाटलांनी दिली 5 कोटींची ऑफर- हर्षवर्धन जाधव

Harshvardhan jadhav_Chandrakant patil
Harshvardhan jadhav_Chandrakant patil

औरंगाबाद : "माझ्या कन्नड मतदारसंघातील रस्त्याची चाळणी झाली आहे. 2016 मार्च मध्ये मंजुर झालेल्या कामांचे दीड वर्ष टेंडर निघत नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांकडे तक्रार घेऊन गेलो तर ते काम करण्याचे सोडून मलाच आमच्या पक्षात या तुम्हाला पाच कोटी रुपये देतो असे आमिष दाखवतात," असा खळबळजनक आरोप कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामा प्रतिनिधीशी बोलताना केला. 

चंद्रकांत पाटलांनी आमदारांच्या मतदारसंघातील कामे करून मन जिंकावी पैसे देऊन नाही असा टोला देखील त्यांनी लगावला. 

या संदर्भात हर्षवर्धन जाधव यांच्यांशी संपर्क साधला असता 17 ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील शासकीय निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांची आपण भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले,
"कन्नड तालुक्‍यातील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील काहीच उपयोग न झाल्यामुळे मी थेट चंद्रकांत पाटलांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था आणि त्यावरून नागरिकांकडून मारले जाणारे टोमणे यांची माहिती दिली. यावर ते ठोस निर्णय घेऊन माझ्या मतदारसंघातील प्रश्‍न सोडवतील असे वाटले होते. "

"पण त्यांनी मला ' शिवसेनेचा राजीनामा द्या, निवडणूकीसाठी तुम्हाला पाच कोटी रुपये देतो, निवडू आल्यावर भाजपमध्ये 'या अशी थेट ऑफर दिली. तुमच्या सोबत आणखी कुणी येणार असतील तर त्यांनाही घेऊन या असेही चंद्रकांत पाटील म्हणाले,"असा दावा आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

यावर आपण त्यांना एवढे पैसे मला देण्याऐवजी मतदारसंघातील कामे करून द्या, मला तुमच्या पाच कोटींची गरज नसल्याचे मी त्यांना सांगितले असल्याचे आमदार जाधव यांचे म्हणणे आहे . 

तुमच्या चुकीमुळे आम्ही शेण  का खायचे? 
"तीन वर्षापासून माझ्या मतदारसंघातील अंधानेर-कोळवाडी, पिशोर-भारंबा तांडा, जळगाव घाट-चापानेर, औराळा-मनेगाव फाटा, औराळा-मनूर, कन्नड-पिशोर रस्त्यांची चाळणी झाली आहे. मतदारसंघातील लोक मला टोमणे मारतात? का हो आमदार या रस्त्यावरून तुमची गाडी पंक्‍चर होत नाही का? अस ते मला हिणवतात. यापैकी अनेक रस्त्यांना दोन वर्षांपासून निधी मंजुर असूनही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. " असे आमदार जाधव यांचे म्हणणे आहे . 

"स्थानिक अधिक्षक अतुल चव्हाण यांच्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केला पण त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तुमच्या चुकीमुळे मी शेण  का खावे? लोक मला शिव्या देतात, त्या तुमच्यासाठी मी का खाव्यात ? "असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. 

"मतदारसंघातील रस्त्यांची जबाबदारी माझी आहे, म्हणून मला हे सगळ सागांव लागतयं.  मला चंद्रकांत पाटलांवर चिखलफेक करायची नाही, किंवा त्यांना टार्गेट देखील करायचे नाही. पाच कोटींचा विषय त्यांनी काढला होता मी नाही. मला माझ्या मतदारसंघातील रस्त्याची कामे करून घ्यायची आहेत. एखादा आमदार मतदारसंघातील काम घेऊन मंत्र्यांकडे गेला तर त्याला कॅशची ऑफर करणे  कितपत योग्य आहे ?" असा प्रश्‍न हर्षवर्धन जाधव यांनी केला. 

ऑफर विषय उध्दव ठाकरेंना माहिती नाही 
 चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन जाधव यांना पाच कोटी रुपये देऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. याची माहिती तुम्ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली का? या प्रश्‍नावर बोलताना आमदार जाधव म्हणाले ," प्रकार चंद्रकांत पाटील आणि माझ्यात घडला. शिवाय मी त्यांची ही ऑफर धुडकावल्याने याची माहिती आपण पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com