मोदी सरकार सत्तेचे भुकेले - सोनिया गांधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

कॉंग्रेसची सरकारे घटनाबाह्य पद्धतीने हटविण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या संविधानाचे रक्षण केले आणि लोकतंत्र पुन्हा बहाल केले. त्याबद्दल कॉंग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा अभिमान वाटतो.
सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा

नांदेड -  ""अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील कॉंग्रेसची सरकारे बरखास्त करण्यात आली. जनमताचा अवमान करतानाच घटनेचीही पायमल्लीही केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेचे भुकेले आहे,‘‘ असा घणाघात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज येथे केला.

शेतकरी, शेतमजूर, कामगार, पददलित, आदिवासी, गोरगरिबांच्या विरोधात आहे. "यूपीए‘ सरकारने त्यांच्यासाठी केलेल्या विविध कल्याणकारी योजना हे सरकार हळूहळू संपवत चालले आहे. हे कॉंग्रेस कदापि सहन करणार नाही; असा इशाराही गांधी यांनी मोदी सरकारला दिला.

श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्‌घाटन आणि पुतळ्याचे अनावरण गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग अध्यक्षस्थानी होते.

गांधी म्हणाल्या, ""देशातील शेतकरी, गोरगरीब, पददलितांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा निधी कमी केल्यामुळे त्याचा परिणाम लाखो गोरगरीब कुटुंबावर होत आहे. शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्याचबरोबर शेतीपूरक असलेल्या विविध सहकारी संस्थाही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर घटनेच्या चौकटीत राहून काम केले. आजच्या भाजप सरकारचे असंवैधानिक काम पाहून चव्हाण यांनीदेखील दुःख व्यक्त केले असते. कॉंग्रेस कधीच अशा घटनांचे समर्थन करणार नाही.‘‘

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, वैशालीताई देशमुख आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

मी भाग्यवान - मनमोहनसिंग
डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, ""शंकरराव चव्हाण यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. ते केंद्रात गृहमंत्री असताना मी अर्थमंत्री होतो. त्या वेळी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करता आले. महाराष्ट्र तसेच देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम कुणीच विसरू शकणार नाही.‘‘

 

Web Title: Modi government power hungry - Sonia Gandhi