जनतेचा आवाज धडकला महापालिकेवर

जनतेचा आवाज धडकला महापालिकेवर

औरंगाबाद - तब्बल ६१ दिवसांनंतरही शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना घाम फोडला. महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसह जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका मुख्यालयासमोर तासभर आंदोलन केले. येत्या तीस एप्रिलपर्यंत रस्ते कचरामुक्त करण्याचे आश्‍वासन या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आंदोलकांना दिले.

औरंगाबाद कनेक्‍ट टीमतर्फे ‘गार्बेज वॉक’चे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता पैठणगेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून वॉकला सुरवात झाली. महापालिका प्रशासनाच्या विरोधात फलक घेऊन शेकडो नागरिक गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे महापालिका मुख्यालयावर धडकले. या ठिकाणी ‘महापालिकेचे करायचे काय...’, ‘महापालिका बरखास्त करा’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सारंग टाकाळकर, जगन्नाथ काळे, समीर राजूरकर यांनी भूमिका विशद करीत जनतेची सहनशीलता आता संपली आहे, तातडीने पावले उचला, असा इशारा दिला. ३० एप्रिलपर्यंत शहर स्वच्छ केले जाईल, असे आश्‍वासन महापौर व अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले. त्यानंतर २ मेला पुन्हा जाब विचारला जाईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. 

वॉकमध्ये मानसिंग पवार, अजय शहा, सुभाष लोमटे, मनोरमा शर्मा, आदेशपालसिंग छाबडा, समीर राजूरकर, रश्‍मी बोरीकर, ॲड. शेख अक्रम, लक्ष्मीनारायण राठी, प्रदीप पुरंदरे, अण्णा वैद्य, जितेंद्र देहाडे, कल्याणी पाटील, संजय राखुंडे, ऋषिकेश जैस्वाल यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. 

शाब्दिक चकमकीने तणाव 
आंदोलकांनी भाषणबाजी बंद करावी, अशी सूचना महापौरांनी केली. त्यातून शाब्दिक चकमकी उडाल्या. एक मे रोजी ध्वजवंदन करू देणार नाही, असा इशारा श्रीकांत उमरीकर यांनी दिल्यानंतर महापौरही आक्रमक झाले. दगड पडेपर्यंत प्रयत्न केले, कचरा पाहून आम्हाला आनंद होत नाही, शासनाकडून आलेल्या एक-एक पैशाचा जनतेला हिशेब देऊ, असे महापौर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com