मुंबई-बिदर रेल्वे जुलैपासून रोज धावणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

लातूर - लातूरचा रेल्वे प्रश्‍न दिल्ली दरबारी गेला असून, लातूरकरांना अल्पसा दिलासा म्हणून जुलैपासून मुंबई-बिदर गाडी रोज धावणार आहे. त्याशिवाय बंगळुरू (यशवंतपूर) ते बिदर ही सध्या सुरू असलेली गाडी लातूरपर्यंत येईल. लातूर रोड ते गुलबर्गा हा नवा लोहमार्गही मार्गी लागेल. मुंबई-लातूर रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सोमवारी (ता. आठ) दिल्लीत भेट घेतल्यावर पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी ही माहिती दिली. पूर्वीची गाडी लातूरसाठीच असावी, ही जनतेची मागणी मात्र दुर्लक्षितच राहिल्यासारखी आहे.

लातूर-मुंबई एक्‍स्प्रेस रोज धावत होती. गेल्या 27 एप्रिलपासून तिचा बिदरपर्यंत विस्तार झाला. लातूरपर्यंत रोज, बिदरला आठवड्यातून तीन दिवस असे या गाडीचे वेळापत्रक ठरले आहे. जुलैपासून हीच गाडी रोज बिदरपर्यंत धावेल. त्यामुळे लातूरकरांची मूळ मागणी साध्य झालेली नाही.

मुंबई-लातूर एक्‍स्प्रेस कर्नाटकातील बिदरपर्यंत नेल्याने लातूरकरांत अस्वस्थता निर्माण झाली. त्यातून आंदोलन उभे राहिले. गाडीचा बिदरपर्यंतचा विस्तार लातूरसाठी गैरसोयीचा ठरेल, असा मतप्रवाह तयार झाला. या निर्णयामुळे लातूरकरांची अस्मिता दुखावली गेल्याची भावना निर्माण झाली. याप्रश्‍नी निलंगेकर यांनी प्रभू यांची भेट घेऊन भूमिका मांडली. त्या वेळी काही नव्या गाड्यांना प्रभूंनी मंजुरी दिल्याची माहिती निलंगेकर यांनी दिली. त्यानुसार मुंबई-बिदर गाडी एक जुलैपासून रोज धावेल. रेल्वेच्या आरक्षणासाठी बिदर, लातूर, उस्मानाबादसाठी समान कोटा मिळेल. याबरोबरच बंगळुरू (यशवंतपूर) ते बिदर ही सध्या सुरू असलेली बिदरपर्यंतची गाडी लातूरपर्यंत येणार आहे. ती नियमित धावणार असल्याने लातूर दक्षिण भारताशी जोडले जाईल. या दोन नवीन गाड्यांसोबत लातूर रोड ते गुलबर्गा या नवीन लोहमार्गाला मंजुरी मिळाली. त्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन हा मार्ग लवकरात लवकरत सुरू केला जाईल. या मार्गावरही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचे प्रयत्न होतील. लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये उद्‌घाटन होईल, असे निलंगेकर यांनी सांगितले.

लातूरची अस्मिता म्हणजे माझी अस्मिता. केंद्रीय मंत्री प्रभू, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक
झाली. त्यातून लातूरसाठी नव्या रेल्वे मंजूर झाल्या आहेत. लातूरकरांना रेल्वेच्या अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, असा प्रयत्न आहे.
- संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर.

भेटीत काय ठरले?
- बंगळुरू (यशवंतपूर) ते बिदर गाडी लातूरपर्यंत येईल
- लातूर रोड ते गुलबर्गा लोहमार्ग लवकरच होणार
- या मार्गावरही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचे प्रयत्न