पगाराचे वांधे, तरीही घेणार दीड कोटीच्या कार!

Aurangabad-Municipal
Aurangabad-Municipal

औरंगाबाद - महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे वांधे झाले आहेत. असे असताना प्रशासनाने दुसरीकडे अधिकाऱ्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या २३ नवीन कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे सादर करण्यात आला असून, त्यावर २० ऑक्‍टोबरला निर्णय होईल. 

महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट आहे. अत्यल्प वसुलीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विकासकामांचे वांधे झाले आहेत. सर्व भिस्त फक्त जीएसटीच्या रूपाने मिळणाऱ्या पैशांवर सुरू आहे. सध्या विविध विकासकामांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी काम बंद आंदोलन केले होते. असे असताना महापालिका प्रशासनाने अधिकाऱ्यांसाठी तब्बल एक कोटी ३८ लाख रुपयांच्या २३ आलिशान कार खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे सादर केला असून, तो २० ऑक्‍टोबरच्या सभेत चर्चेसाठी घेण्यात येणार आहे. 

महापालिकेकडे सध्या अधिकाऱ्यांसाठी ३२ वाहने आहेत. शिवाय १७ अधिकारी खासगी वाहने वापरतात. त्यापोटी अधिकाऱ्यांना महापालिकेच्या तिजोरीतून प्रतिपूर्ती रक्कम अदा केली जाते. अधिकारी सध्या वापरत असलेल्या वाहनांपैकी १४ वाहनांचे आयुष्यमान दहा वर्षांपेक्षा अधिक झाले आहे. 

मालमत्ता व पाणीपट्टी करवसुली, तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी वॉर्ड अधिकारी यांना कार्यालयीन वाहन असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वॉर्ड अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी यांच्यासाठी १० टाटा सुमो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी १३ कार खरेदी  कराव्या लागणार आहेत, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

पदाधिकाऱ्यांसाठी यापूर्वीही वाहनांची खरेदी 
यापूर्वी पदाधिकाऱ्यांसाठी तीन आलिशान वाहने खरेदी करण्यात आली आहेत. महापौर, उपमहापौर यांच्यासाठी टाटा हेक्‍सा, तर स्थायी समिती सभापतीसाठी कार खरेदी करण्यात आली होती. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com