दीड लाखाची वीज फुकटात!

औरंगाबाद - महापालिकेच्या इमारतीवर बसविण्यात आलेले सौर ऊर्जेचे पॅनेल.
औरंगाबाद - महापालिकेच्या इमारतीवर बसविण्यात आलेले सौर ऊर्जेचे पॅनेल.

औरंगाबाद - महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्याच सौर ऊर्जा प्रकल्पाचे गुरुवारी (ता. १३) मोठा गाजावाजा करून उद्‌घाटन केले. या प्रकल्पातून गेल्या महिनाभरापासून रोज ८० किलोवॅट विजेची निर्मिती होत आहे; मात्र विजेची मोजणी करण्यासाठी अद्याप नेट मीटर बसविण्यात आले नसल्याने गेल्या महिनाभरात तब्बल दीड लाखाची वीज कंपनीला फुकटात गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश केल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे; मात्र मागील दोन ते अडीच वर्षांपासून स्मार्ट योजनांसाठी केवळ प्लॅनिंगच सुरू आहे. त्यामुळे हा निधी अद्यापपर्यंत पडून आहे. असे असतानाच गुरुवारी स्मार्ट योजनेतील पहिल्याच सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले. 

या प्रकल्पामुळे महापालिकेला ८० किलोवॅट वीज मिळणार असून, रोजची पाच हजार रुपयांची, तर महिन्याची दीड लाख रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रकल्पाचे उद्‌घाटन गुरुवारी करण्यात आले असले तरी गेल्या ता. १५ ऑगस्टपासून या प्रकल्पातून महापालिकेला वीज मिळत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नेट मीटर बसविण्याची जबाबदारी महापालिकेने स्वतःकडे घेतली होती; मात्र अद्यापपर्यंत नेट मीटर बसविण्यात आलेले नाहीत. जोपर्यंत नेट मीटरद्वारे किती वीज प्रकल्पातून तयार होत आहे हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत वीज कंपनी बिलात कपात करू शकत नाही. 

त्यामुळे प्रकल्प सुरू झाला असला तरी सध्याची वीज मोफत कंपनीकडे जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सुरक्षेचे वावडे 
या प्रकल्पावर तब्बल ४७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र सुरक्षेसाठी कुठलीही यंत्रणा नाही. छतावर जाण्यासाठीच्या जिन्याला साधे दरवाजे बसविण्याचे काम महापालिकेने केलेले नाही.

जागेअभावी रखडला प्रकल्प 
प्रकल्पाचे ता. २६ जानेवारीला भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी तीन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे महापालिकेने जाहीर केले; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण होण्यासाठी नऊ महिने लागले. कंत्राटदाराला जागेचा ताबाच उशिरा मिळाल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com