महापालिकेत पुन्हा पाणी पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

औरंगाबाद - पाण्यासाठी नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली असताना महापालिकेत मात्र फक्त बैठकांवर जोर सुरू आहे. बुधवारी (ता. ३०) महापौरांनी आता कोणाचीही गय केली जाणार नाही, यापुढे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत दिला.

औरंगाबाद - पाण्यासाठी नागरिकांच्या घशाला कोरड पडलेली असताना महापालिकेत मात्र फक्त बैठकांवर जोर सुरू आहे. बुधवारी (ता. ३०) महापौरांनी आता कोणाचीही गय केली जाणार नाही, यापुढे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत दिला.

गेल्या दोन महिन्यांपासून विस्कळित झालेला शहराचा पाणीपुरवठा अद्याप पूर्वपदावर आलेला नाही. जुन्या शहरात सातव्या दिवशी; तर सिडको-हडकोत पाचव्या दिवशी पाणी येत असल्याने संतप्त नगरसेवक, नागरिक वारंवार आंदोलन करीत आहेत. त्यांना आश्‍वासने देणारे पदाधिकारीदेखील आता तोंडावर पडत आहेत. एमआयएमच्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. २८) पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषण सुरू केले होते. त्यावेळी महापौरांनी मध्यस्थी करत २४ तासांत जुन्या शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते; मात्र त्यानंतरही बुधवारी सकाळी जुन्या शहरातील बहुतांश वसाहतींमध्ये पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महापौरांकडे केल्या.

त्यांनी दुपारी दालनात बैठक घेतली. या वेळी एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी, नगरसेवक अयुब जागीरदार, सय्यद मतीन दाखल झाले. प्रत्येकाने आपापल्या वॉर्डांतील पाणीप्रश्‍न सांगत अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर महापौर घोडेले संतप्त झाले. यापुढे सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा दम त्यांनी भरला. 

आयुक्‍तांनी केली आश्‍वासनावर बोळवण 
एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी बुधवारी सकाळीच आयुक्‍तांची भेट घेतली; मात्र आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी पाच मिनिटांत त्यांचे म्हणणे ऐकून घेत आश्‍वासनावर बोळवण केली. 

चार अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश 
शहागंज व क्रांती चौक येथील पाण्याच्या टाक्‍यांवर जास्तीचा लोड आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन अभियंते नियुक्त करून नियोजन करण्याचे आदेश महापौरांनी कार्यकारी अभियंता चहेल यांना दिले.

Web Title: municipal water supply issue