आखाडा बाळापूर येथे खदानीत तरुणाचा खून

आखाडा बाळापूर येथे खदानीत तरुणाचा खून
नरबळीची चर्चा; मृतदेहाजवळ लिंबू, हळद
आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) - येथील एका तरुणाचा खदानीत दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार शनिवारी (ता. 24) उघडकीस आला. मृतदेहास्थळी लिंबू, हळद, मद्याची बाटली आदी वस्तू आढळल्याने हा प्रकार नरबळीचा असल्याची चर्चा आहे.

येथील सराफ व्यावसायिक सुरेश परशुराम जाधव यांचे "पाटील ज्वेलर्स' नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. तेथे त्यांचा मेहुणा भोजलिंग प्रताप पाटील (वय 26, ह. मु. आखाडा बाळापूर, रा. घोटी, ता. खानापूर, जि. सांगली) कामावर आहे. तो शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी सहापासून त्याच्या स्कुटीसह (एमएच-38 एस-1399) अचानक बेपत्ता झाला. तशी तक्रार सुरेश जाधव यांनी येथील पोलिसांत दिली होती. शोधाशोध सुरू असताना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ भोजलिंगची स्कुटी सापडली. परिसरात पाहणी केली असता खदानीतील झाडाझुडपांत भोजलिंगचा रक्‍तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला. पंचनामा करताना पोलिसांना मृतदेहाजवळ लिंबू, हळद, मद्य व पाण्याची बाटली दिसली. चाकू, खंजीर, तलवारीसारख्या हत्याराने भोजलिंगच्या शरीरावर चार ते पाच वार, डोके दगडाने ठेचल्याचे आढळले. हे कृत्य चार ते पाच जणांनी केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलिस उपअधीक्षक शशीकरण काशीद, निरीक्षक गणेश अहिर, फौजदार सदानंद मेंडके आदींनी परिसर पिंजून काढला. श्वानपथक घटनास्थळीच फिरले. दरम्यान, हा प्रकार नरबळीचा असावा, अशी नागरिकांत चर्चा आहे. तपासादरम्यान याअनुषंगाने पोलिस शहानिशा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com