नको खोटे भाषण; आम्हा द्या आरक्षण

नको खोटे भाषण; आम्हा द्या आरक्षण

बीड - 'ना झुठा भाषण, ना मुफ्त का राशन, हमें चाहिए आरक्षण' असे म्हणत मुस्लिम बांधवांनी मंगळवारी (ता. 20) बीड शहरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढला आणि समाजाला आरक्षणासाठी एल्गार केला. मोर्चात जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने जिल्हा क्रीडा संकुल हाऊसफुल्ल होऊन गेले. तिरंगा ध्वजाचा वापर, राष्ट्रगीताने मोर्चाची सुरवात आदींमुळे वातावरण भारावून गेले होते.

गेल्या महिनाभरापासून मोर्चाचे नियोजन सुरू होते. गावोगावी घेतलेल्या बैठका, प्रसिद्धी माध्यमे - सोशल मीडियाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अभूतपूर्व गर्दी आणि एकजूट पाहायला मिळाली. या मोर्चात राजकीय व्यक्तींचा सहभाग असला तरी विशिष्ट असे कुणाचे नेतृत्व नव्हते. मराठा क्रांती मोर्चा, दलित ऐक्‍य मोर्चा, ओबीसी मोर्चाच्या धर्तीवर हा मोर्चा होता. ठरल्याप्रमाणे सकाळी दहापासूनच जिल्हा क्रीडा संकुलात मोर्चेकरी दाखल होऊ लागले. साडेअकराच्या सुमारास क्रीडा संकुल हाऊसफुल्ल झाले. नंतर संकुलाबाहेरील रस्तेही गर्दीने फुलून गेले. राष्ट्रगीतानंतर जिल्हा क्रीडा संकुलापासून दुपारी बाराला मोर्चाला सुरवात झाली. पठाणी पेहराव, डोक्‍यावर टोपी, गळ्यात हिरवा तसेच काळा रुमाल, मुस्लिम आरक्षण मोर्चाचे स्टीकर लावून बहुतांश नागरिक मोर्चात सहभागी झाले. अनेकांच्या हाती तिरंगा ध्वज होता. मोर्चाच्या नियोजित रस्त्यांसह शहरातील अन्य रस्तेही गर्दीने भरून गेले. सिद्धिविनायक संकुल, सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे मोर्चा नगर रोडने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बलभीम चौकात मिल्लिया महाविद्यालयात जमलेला मुस्लिम विद्यार्थ्यांचा जत्था मुख्य मोर्चात मिसळला. त्यामुळे मोर्चाच्या गर्दीत आणखी मोठी भर पडली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुलांनी मागण्यांच्या निवेदनाचे जाहीर वाचन केले. त्यानंतर सामुदायिक दुआ मागून मोर्चाची सांगता झाली.

जिल्ह्यात मुस्लिम समाज संख्येने कमी असतानाही मोर्चाला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला. हा मोर्चा ऐतिहासिक ठरल्याच्या प्रतिक्रिया समाजबांधवांमधून व्यक्त होत होत्या. मोर्चादरम्यान कसलीही घोषणाबाजी नव्हती की कसलाही गोंधळ नव्हता. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने तो पार पडला.

मराठा संघटनांकडून पाणी
आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मुस्लिम आरक्षण मोर्चाला मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांसह सकल मराठा संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता. केवळ पाठिंबाच दिला नाही तर मोर्चादरम्यान मराठा संघटनांनी मुस्लिम बांधवांसाठी मोफत पाणी पाऊचचे वाटपही केले. मराठा समाजासह मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भावना या संघटनांनी व्यक्त केली.

अल्पोपाहार, जेवणाची सोय
मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था होती. जालना रोडवर नाश्‍ता तर पाटोद्याकडून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांसाठी लिंबारुई फाट्यावर तर शहरात मोमीनपुरा भागात जेवणाची व्यवस्था होती.

अशा होत्या मागण्या
* शासनाने मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू करावे
* मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये
* समान नागरी कायदा लागू करू नये
* मुस्लिम संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद करावी
* निर्दोष मुस्लिम युवकांना विनाचौकशी
दहशतवाद कायद्याखाली अटक करू नये
* जेएनयूमधील बेपत्ता मुस्लिम युवकाचा शोध लावावा
* मराठा समाजालाही आरक्षण द्यावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com