मुस्लिम समाजाचा आज मूक मोर्चा

मुस्लिम समाजाचा आज मूक मोर्चा

जय्यत तयारी, मोर्चेकऱ्यांना नाश्‍ता, भोजनाचीही व्यवस्था, जिल्हाभरातील समाजबांधव होणार सहभागी

बीड - मुस्लिम समाजाला आरक्षण, संरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) निघणाऱ्या मुस्लिम मूक मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली. जागोजागी होर्डिंग लावले असून, मोर्चेकऱ्यांच्या नाश्‍ता व भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजकांनी सोमवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत दिली. 

शासनाने मुस्लिम आरक्षण तत्काळ लागू करावे, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये, समान नागरी कायदा लागू करू नये, मुस्लिम संरक्षणासाठी कडक कायद्याची तरतूद करावी, निर्दोष मुस्लिम युवकांना विनाचौकशी दहशतवाद कायद्याखाली अटक करू नये, तसेच जेएनमधील बेपत्ता मुस्लिम युवकाचा शोध लावावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, असेही या वेळी नमूद करण्यात आले. जोपर्यंत समाजातील सर्व घटक विकासाच्या प्रवाहात येणार नाहीत तोपर्यंत देश प्रगती करू शकणार नाही, असेही यावेळी संयोजकांनी सांगितले. धर्मगुरूंसह समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्तींची यावेळी उपस्थिती होती. मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागोजाग बैठका, कॉर्नर सभा घेण्यात आल्या.  छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून निघणारा मोर्चा सुभाष रोड, माळीवेस, धोंडीपुरा, मिलिया कॉलेज, किल्ला मैदान, बलभीम चौकमार्गे कारंजा रोडकडे वळविला जाणार आहे. मोर्चात सहभागी होणारे विद्यार्थी मिल्लिया महाविद्यालयात एकत्र जमणार आहेत. त्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल. या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते निवेदन दिले जाणार आहे. दरम्यान, राष्ट्रगीताने मोर्चाची सुरवात होऊन दुआ मागून सांगता होईल. या मोर्चाला सकल मराठा समाज संघटनेसह विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याचेही संयोजकांनी सांगितले. 

या ठिकाणी अल्पोपाहाराची सोय
सहभागी होणाऱ्या मोर्चेकऱ्यांना अल्पोपाहार व जेवणाची सोयही करण्यात आली. जालना रोडवर नाश्‍ता तर पाटोद्याकडून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांना जाताना लिंबारुई फाट्यावर जेवणाची सोय केली आहे. मोर्चा संपल्यानंतर मोमीनपुरा भागातही जेवण ठेवले आहे. तर मोर्चाच्या रस्त्यावर विविध भागांत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. 

तीन ठिकाणी पार्किंग
मोर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी जालना रोडवरील ख्वाजा कॉम्प्लेक्‍स, तेलगाव नाका व मोदी सभा मैदान अशा तीन ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. मोर्चामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी दोन हजार स्वयंसेवक असतील. यातील पाचशे स्वयंसेवक पोलिसांना मदत करतील. वॉकीटॉकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.  

वाहतूक मार्गात बदल 
या मोर्चातील नागरिकांची संख्या लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा ते गढी जाणारा मार्ग अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद असणार आहे. या मार्गावरून येणाऱ्या वाहनांसाठी मांजरसुंब्यावरून नेकनूर, केज, धारूर, तेलगाव, माजलगाव, गढी हा मार्ग असणार आहे. शहरातील जय भवानी चौक ते शिवाजी पुतळा हा मार्ग सर्वच वाहनधारकांसाठी बंद असेल. या रस्त्यावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून नवगण कॉलेज, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, नगर नाकामार्गे आहे. मोंढा टी पॉइंट ते शिवाजी चौक हा मार्गदेखील सर्वच वाहनधारकांसाठी बंद असेल. या मार्गावरील वाहनधारकांना रिलायन्स पेट्रोलपंप, अंबिका चौक, राजीव गांधी चौक, नगर नाका यामार्गे जाता येईल. शहरातील आंबेडकर चौक ते साठे चौक हा सुभाष मार्ग वाहतुकीस बंद असेल. चांदणी चौक, बलभीम चौक ते शिवाजी चौक हा मार्गदेखील बंद असल्याने वाहनधारकांना चांदणी चौक, मोमीनपुरा बार्शी नाकामार्गे जाता येईल. 

बससाठी मार्ग 
जालना रस्त्याकडून बार्शीकडे जाणाऱ्या बस बसस्थानकात येऊन परत मोंढा -खंडेश्वरी-नाळवंडी नाका- तेलगाव नाका यामार्गे, तर नगरमार्गे येणाऱ्या बसगाड्या नगर नाका, राजीव गांधी चौक, अंबिका चौक, रिलायन्स पेट्रोलपंप मार्गे बसस्थानकात जातील व नगर मार्गाने जाणाऱ्या बस या बसस्थानकातून याच मार्गे नगरकडे जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com