नळदुर्ग किल्ल्याचा बदलला चेहरामोहरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नर-मादी धबधबाही वर्षभर सुरू राहणार, लवकरच बोटिंगचीही सोय

नळदुर्ग - राज्यातील किल्ल्यांपैकी सर्वांत मोठा भुईकोट किल्ला म्हणून नळदुर्गचा उल्लेख केला जातो. पावसाळ्यात येथील नर मादी धबधबा पर्यटकांसाठी खास पर्वणीच ठरते. वर्षभर या किल्ल्यात पर्यटकांची गर्दी असते, असे असूनही पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याला बकाल रूप आले होते. आता मात्र या किल्ल्याचा चेहरामोहरा बदलला आहे.

नर-मादी धबधबाही वर्षभर सुरू राहणार, लवकरच बोटिंगचीही सोय

नळदुर्ग - राज्यातील किल्ल्यांपैकी सर्वांत मोठा भुईकोट किल्ला म्हणून नळदुर्गचा उल्लेख केला जातो. पावसाळ्यात येथील नर मादी धबधबा पर्यटकांसाठी खास पर्वणीच ठरते. वर्षभर या किल्ल्यात पर्यटकांची गर्दी असते, असे असूनही पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्याला बकाल रूप आले होते. आता मात्र या किल्ल्याचा चेहरामोहरा बदलला आहे.

राज्याच्या वैभव संगोपन योजनेंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टिकॉन कंपनीने नळदुर्ग किल्ल्याचे जतन व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केल्याने किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. केवळ पावसाळ्यातच सुरू राहणारा ‘नर-मादी’ धबधबा लवकरच वर्षभर सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे.  

अनेक शूर वीर, राजे, महाराजे व इंग्रजांची राजवट, लढाई, आक्रमणे अनुभवलेला हा किल्ला अनेक शतकांपासून इतिहासाची साक्ष देत उभा आहे. साठ वर्षांपूर्वी जिल्ह्याचा कारभार नळदुर्ग किल्ल्यातूनच चालत असे.

वैभवशाली खुणा, प्रेक्षणीय स्थळे, तोफ, उपळी बुरूज, पाणी महल आदींसारखी नयनरम्य ठिकाणे येथे आहेत. नळदुर्गच्या किल्ल्यात यापूर्वी सिने अभिनेते रमेश देव यांच्या ‘सर्जा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. त्याचबरोबर तेलुगु, मल्ल्याळ्यम, हिंदी, कन्नड भाषांतील मालिकांचे व चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले आहे. अनेक क्षेत्रांतील नामवंत व्यक्तीही या किल्ल्यास भेट देत असतात. पर्यटकांची मोठी संख्या असूनही पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले होते. किल्ल्याच्या तटबंदीसह अंतर्गत परिसरातही झाडेझुडपे अफाट वाढली होती. किल्ल्यात मोकाट जनावरांचा वावरही होता. शिवाय बुरूज व तटबंदी, भिंतींची पडझड, तोफांची झीज, कचरा, प्रेमवीरांनी रंगविलेल्या भिंती यामुळे किल्ल्यास बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स व पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या दरम्यान नळदुर्ग किल्ला संगोपनार्थ घेण्याबाबतचा सामंजस्य करार २०१४ मध्ये झाला. कंपनीने युद्धपातळीवर विकासकामे सुरू केली. त्यामुळे किल्ल्याचे रूपडेच पालटले आहे. किल्ल्यातील पडझड झालेले बुरूज व तटबंदीची डागडुजी करण्यात आली आहे. तोफांचे संवर्धन, रंगविलेल्या भिंतींची व किल्ला परिसराची स्वच्छता, तटबंदीवर आलेल्या झाडाझुडपांची स्वच्छता, प्रवेशद्वाराची बांधणी, पावसाळ्यामध्ये पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या नर-मादी धबधब्याचे सुशोभीकरण, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व किल्ल्यातील विविध प्रेक्षणीय स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी सुसज्ज रस्ते, हिरवळ, आकर्षक कारंजे, फुलझाडे, वृक्षारोपण आदींसह विविध सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

किल्ल्याच्या मूळ ऐतिहासिक स्वरूपाला धक्‍का न लावता दुरुस्ती करून संवर्धन केले जात आहे. लवकरच नळदुर्ग शहराच्या उत्तरेस असलेल्या ऐतिहासिक बोरी नदीत बोटिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यामध्येच वाहणारा नर-मादी धबधबा आता वर्षभर काही ठराविक दिवशी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू करण्यात येणार असल्याचे युनिटी कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांनी सांगितले. त्यामुळे आता वर्षभर पर्यटकांना धबधब्याचा आनंद लुटता येणार आहे.

Web Title: naldurg fort development