नांदेड : आश्रमशाळेतील दोन मुलींना सर्पदंश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कुपटी (बुद्रूक) येथील शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश झाला. शिक्षकांनी या दोघींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने दोन्ही आदिवासी मुलींचे प्राण वाचले.

इस्लापूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कुपटी (बुद्रूक) येथील शासकीय आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना झोपेतच सर्पदंश झाला. शिक्षकांनी या दोघींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने दोन्ही आदिवासी मुलींचे प्राण वाचले. ही घटना गेल्या गुरुवारी (ता. १३) रात्री एकच्या सुमारास कुपटी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात घडली.

कुपटी (बुद्रूक) येथील शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, या शाळेत १०९ मुले, ११८ मुली असे एकूण २२७ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. गुरुवारी (ता. १३) सर्व विद्यार्थिनी अभ्यास करून वसतिगृहात झोपल्या होत्या. यातील अंजली विठ्ठल मेढे (सहावी, वय १२), वर्षा सुभाष दांडेगावकर (सातवी, वय १३) यांना सर्पदंश झाला. ही माहिती अधीक्षक टी. बी. राठोड यांना कळताच त्यांनी ए. एस. निवळे व व्ही. डी. सोमुशे या दोन शिक्षकांना आणि सरपंच बापूराव वानोळे यांना तातडीने बोलावून या मुलींना इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

किनवटचे प्रकल्पाधिकारी विशाल राठोड यांनी शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी नितीन जाधव, संतोष चव्हाण, शेगोकार, सुनील बारसे यांना पाठवून मुलींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मुलींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी विशाल राठोड व शाळेचे मुख्याध्यापक एस. यू. दासरे यांनी दिली. शाळेतील अधीक्षकांसह शिक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परता दाखविल्यानेच या आदिवासी मुलींचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया मुलींच्या पालकांनी व्यक्त केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :