देशाला मुसलमानांकडून नाहीतर भाजपकडून धोकाः अबू आझमी

abu azmi
abu azmi

समाजवादी पक्ष महापालिकेच्या ५० जागा लढविणार

नांदेडः सद्या देशाची अवस्था वाईट असून, धर्माच्या नावाने सत्तेत आलेले भाजप गाय व बैलावर राजकारण करत आहे. देशात माणसांचा सन्मान कमी पण जनावरांचा सन्मान वाढत असून, देशाला मुसलमानांकडून नाहीतर भाजपकडून धोका असल्याचे समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत टीका केली.

नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज (बुधवार) आयोजित पत्रकार परिषदेत आमदार आझमी यांनी माहिती दिली. यावेळी प्रदेश सचिव करमुल्लाह खान, मिर्झा नवाब बेग, साजीद कुरेशी, मोहसीन सुन्नर, परवेझ सिद्दीकी, अफझल फारुखी आदींची उपस्थिती होती.

आझमी म्हणाले, 'समाजवादी पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा पक्ष असून, धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांनी एकत्र येऊन निवडणुक लढवावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी बोलणे झाले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. नांदेड महापालिकेसाठी ५० जागांवर समाजवादी पक्ष उमेदवार देणार आहे. काँग्रेसची सेक्युलर निती असली तरी त्यांची नियत बदलली असून, त्यांच्यामुळे आज भाजप सत्तेमध्ये बसली आहे. आस्थेच्या नावावर देश चालत नाही, देशातील भ्रष्टाचार बंद झाल्याशिवाय विकास होणार नाही, करोडो रुपये जाहिरातीवर खर्च केला जातोय. हे आता जनतेने रोखले पाहिजे. पैशाच्या बळावर निवडणुका लढविल्या जात आहेत. गरीब व्यक्तीला निवडून द्यावे. भिवंडीमध्ये काँग्रेसला बहुमत असतानाही शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली जाते. आता इकडे शिवसेनेच्या विरोधात निवडणुक लढवतील. समाजवादी पक्षाकडून गरीब कार्यकर्ता निवडणूक लढवतील. मागील महापालिका निवडणूकीत एमआयएम पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. ते सर्व आता काँग्रेसमध्ये आहेत. समाजवादी पक्ष सर्व प्रामाणिक लोकांना उमेदवारी देणार, आमचा महापौर होणार नाही, हे माहीत आहे मात्र जेवढ्या जागा जिंकू त्यावर महापालिका चांगल्या पद्धतीने चालवून दाखऊ.'

'या देशाला मुसलमानांनी कधी दगा दिला नाही. ‘वंदे मातरम’चे वाचन करु शकत नाही. मात्र, त्याचा अपमान देखील करु शकत नाही, एमआयएम हा पक्ष कट्टरपंथी असून त्यांच्यासोबत जाणार नाही, आमच्याकडे १५० इच्छूकांनी उमेदवारी मागितली आहे,' असेही आझमी म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाळासाहेब कधीच झुकले नाहीत..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या आयुष्यात कुणासमोर झुकले नाहीत. तसेच त्यांना कोणी जेलमध्ये टाकण्याची हिंमत केली नाही. ते कधी दिल्लीला राष्ट्रपती अथवा पंतप्रधानांना भेटायला गेले नाहीत. प्रत्येकजण त्यांना भेटण्यासाठी घरी येत असत. त्यांचा एवढा दरारा होता. आता त्यांचेच सुपुत्र असलेले उध्दव ठाकरे यांनी वडिलांचा आदर्श पाळावा, असे मला वाटत असल्याचे अबू आझमी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com