नांदेड : भोकरच्या पोलिस निरीक्षकाला अशीही शिक्षा !

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पोलिस वाहनांवरील ध्वनीक्षेपकाचा लोकप्रतिनिधींकडून वापर

नांदेड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पोलिसांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करुन राज्य आणि केंद्र सरकारवरच टीका केल्याच्या प्रकाराचे पडसाद पोलिस दलात उमटले असून, या प्रकाराला जबाबदार धरुन भोकर येथील पोलिस निरीक्षकाला नांदेडच्या नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस निरीक्षक आज (मंगळवार )नांदेडला हजेरी लावून सुट्टीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

भोकर तालुक्यातील दिवशी (बु) येथील रामा पोतरे या शेतकऱ्याचा शनिवारी किनी येथील बँकेच्या रांगेत उभा असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पीकविमा भरताना एका शेतकऱ्याचा बळी जाण्याची ही घटना तशी राज्यातील पहिली. पोतरे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी दिवसभर मृतदेह ताब्यातही घेतला नव्हता. रविवारी सकाळी यावर तोडगा निघाल्यानंतर पोतरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर रविवारी खासदार चव्हाण पोतरे यांच्या कुटूंबियाचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांनतर ते भोकरला आले. (भोकर हा खासदार चव्हाण यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. येथून त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण सध्या आमदार आहेत.) या वेळी भेाकर येथील एसबीआय बँकेसमोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पीकविमा भरण्यासाठी जमलेली होती. ही गर्दी पाहून शेतकरी व बँक अधिकाऱ्यांयाशी संवाद साधण्याची इच्छा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आणि लगेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस वाहनावरील पीए सिस्टीमचा (ध्वनीक्षेपक) वापर करुन भाषणही केले.

विशेष म्हणजे पीकविम्यावरुन त्यांनी त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारला लक्ष्य केले. सरकारी यंत्रणेचा वापर करुन विरोधी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने सरकारवरच टिका केल्याने सरकारी यंत्रणाही जागी झाली. यावरून वादंग निर्माण होण्याची शक्यता दिसताच पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी भोकरचे पोलिस निरीक्षक सांदीपन शेळके यांना नियंत्रण कक्षात संलग्न केले. आपल्या गाडीचा वापर लोकप्रतिनिधींना करू देणे शेळके यांना चांगलेच महागात पडले आहे. शेळके यांनी आज नियंत्रण कक्षात हजेरी लावली आणि लगेच ते सुट्टीवर गेल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या भोकरचा पदभार सहायक पोलिस निरीक्षक श्री. भालके यांना देण्यात आला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :