खरीप हंगामासाठी सुलभ पीक कर्ज अभियान

Representational image
Representational image

नांदेड : गुरुवारी (ता.एक) मुंबई येथील मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाच्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या खरीप व रब्बी हंगामात व्यापारी बॅंकामार्फत पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील १६ जिल्ह्यात सुलभ पीक कर्ज अभियान राबविण्यात येणार असल्याचे मंगळवारी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने परिपत्रक काढले आहे. २०१६-१७ वर्षात राज्यातील ५७ लाख शेतकऱ्यांना ४२ हजार १७२ कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकामार्फत ३३.१२ लाख शेतकऱ्यांना १५ हजार ५७१ कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आले. २०१७-१८ या वर्षासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीमार्फत ५४ हजार २२० कोटी पीक कर्ज वाटपाचे निश्‍चित करण्यात आले अाहे.

शासनाने काढलेल्या परिपत्रकात खरीप हंगामासाठी सुलभ पीक कर्ज अभियानात धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापुर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, यवतमताळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर व वर्धा आदी जिल्ह्यांचा समावेशकरुन या जिल्ह्यांमध्ये आवश्‍यकतेप्रमाणे शेतकऱ्यांना खरीप हंगामात व्यापारी बॅंकामार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी सुलभ पीक कर्ज राबविण्यात येणार आहे.
या अभियानाचा कालावधी सोमवार (ता.पाच) जून ते (ता.३१) जुलैपर्यंत असा राहणार असून आवश्‍यकतेप्रमाणे हा कालावधी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समीती निर्णय घेतील.

या अभियानात महसुल विभाग, कृषि विभाग, सहकार विभाग व ग्रामविकास विभाग यांचा सहभाग असेल. प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी बॅंकांना डीएलसीसी मार्फत पीक कर्जाचा लक्षांक देण्यात आला आहे. सदर अभियानाव्दारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने या बॅंकांना २०१७-१८ साठी शेतकरी संख्येचा देखील लक्ष देण्यात येणार आहे.

कसे राबवणार सुलभ पीक कर्ज अभियान
प्रत्येक जिल्ह्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखा असलेल्या गावात वेळोवळी कर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात यावे, या मेळाव्यास जिल्ह्यातील खासदार किंवा विधान परिषद सदस्य यांची उपस्थिती असेल, तालुक्यातील किमान एका कर्ज मेळाव्यास मतदार संघाचे आमदार यावेत, कर्ज मेळाव्यात सहभागी होणाऱ्या सर्व गावातील पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी यापुर्वीच व्यापारी बॅंकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

कर्ज मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा उतारा, ८अ व ६ड उतारा तलाठी यांनी उपलब्ध करुन द्यावे, बॅंकेने शक्यतो त्याच दिवशी कर्ज प्रकरणे मंजूर करावीत किंवा जास्तीत जास्त तीन दिवसात शेतकऱ्यांना कर्ज मंजुर करण्याबाबत निर्णय घ्यावा. ज्या बॅंका खरीप हंगामात पीक कर्जाची रक्कम व शेतकरी संख्या या दोन्हीचे लक्षांक पुर्ण करतील अशा बॅंकांच्या अधिकाऱ्यांचा जिल्हाचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com