महापालिकेचा वसुली लिपीक 'ACB'च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

शास्ती कमी करण्यासाठी घेतली तीन हजारांची लाच
बुधवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीन जवळ सापळा लावला आणि बिल कलेक्टर सिरमेवार याला तीन हजाराची लाच स्वीकारताना पकडले.

नांदेड : बांधकामावरील शास्ती कमी करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा नांदेड महापालिकेचा बिल कलेक्टर (वसुली लिपीक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीनमध्ये कार्यरत असलेले प्रभारी बिल कलेक्टर यांनी त्यांच्या हद्दीत असलेल्या एका मालमत्ताधारकाला अतिरिक्त बांधकामाची शास्ती दोन लाख ३० हजार रूपये लावली. परंतु ही शास्ती व नियमित कर सदर मालमत्ता धारक भरू शकत नव्हता. त्यामुळे तो बिल कलेक्टर पुरुषोत्तम बालाजी सिरमेवार यांच्यकडे गेले. यावेळी शास्ती कमी करायची असेल तर चार हजार रुपये लाच मागितली. परंतु तडजोड अंती ही लाच तीन हजार रुपये द्यायचे ठरले.

मात्र तक्रारदार तथा मालमत्ताधारक यांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात जाऊन २६ मे रोजी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे या विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर बुधवारी (ता. ३१) सकाळी अकरा वाजता क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीन जवळ सापळा लावला आणि बिल कलेक्टर सिरमेवार याला तीन हजाराची लाच स्वीकारताना पकडले. त्याच्याविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर, बाबू गाजूलवार, एकनाथ गंगातिर्थ, अनिल कदम यांच्या पथकांनी परिश्रम घेतले.