दिव्यांगांना मिळणार आता ‘युनिक कार्ड’

जयपाल गायकवाड
बुधवार, 24 मे 2017

बोगस लाभार्थ्यांवर अंकुशासाठी निर्णय ; आधार कार्डशी होणार ‘लिकिंग’

नांदेड : ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करताना पारदर्शकता यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, बोगस अपंग लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी आता दिव्यांगांना लवकरच रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बोगस लाभार्थ्यांवर अंकुशासाठी निर्णय ; आधार कार्डशी होणार ‘लिकिंग’

नांदेड : ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल करताना पारदर्शकता यावी, विविध शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा, बोगस अपंग लाभार्थ्यांना आळा बसावा यासाठी आता दिव्यांगांना लवकरच रंगीत युनिक कार्ड (ओळखपत्र) मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्ह्यासह राज्यभरात दिव्यांगांच्या नावावर लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यात शासकीय कर्मचारी बदलीसाठी धडपड करीत असतात. राज्यात अनेक ठिकाणीही बोगस अपंगांचे प्रकरण काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून दिव्यांगांच्या विविध सवलती लाटणाऱ्यांवर शासनाने आता टाच आणली आहे. अपंगांसाठीच्या सवलती लाटणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना चाप बसावा, यासाठी युनिक कार्ड तयार करून देत कार्डधारक अपंगांना देशभरात कोठेही विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी लवकरच दिव्यांगांचा शासनातर्फे नव्याने सर्व्हे करण्यात येणार असून, खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्यांना या ‘युनिक कार्ड’च्या माध्यमातून खड्यासारखे बाहेर काढले जाणार आहे. यासाठी देशभरातील दिव्यांगांच्या संख्येची माहिती एकत्रित केली जात आहे.

अधिकाधिक योजनांचा लाभ
शासनाच्या या निर्णयामुळे खऱ्या लाभार्थ्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ घेता येणार आहे. ज्यांना अपंगत्व आले आहे किंवा एखाद्या अपघातात जे अपंग झाले, त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता येत नाही. त्यांच्यासाठी शासन विविध योजना राबवीत असते. अनेक सवलतीसुद्धा शासन त्यांना देत आहे. एसटी बस आणि रेल्वेच्या प्रवासात सूट दिली जाते. व्यवसाय, उद्योगांमध्येही लाभ दिला जातो. मात्र, अलीकडे खऱ्या लाभार्थ्यांऐवजी धडधाकट नागरिक अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासनाच्या सवलती लाटतात. त्यामुळे खरे लाभार्थी त्यांच्या सेवा- सवलतीपासून वंचित राहत आहेत. यावर शासनाने आता ‘सर्जिकल स्ट्राइक’ केले असून, देशातील सर्व दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना रंगीत युनिक कार्ड दिले जाणार आहे.

आधार कार्डशी ‘लिंकिंग’
हे कार्ड आधार कार्डशी "लिंक' केले जाणार आहे. त्यामुळे साहजिकच ज्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे, ते यातून बाद होणार आहेत. कारण आधार कार्ड काढताना जो अपंग आहे, त्यांनीच अपंग असल्याची माहिती दिली आहे, हे विशेष. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात किती दिव्यांग आहेत, त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे, याची माहिती आता अधिकृतपणे एकत्रित केली जात आहे. ही माहिती एकत्र झाल्यानंतर या दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज भरून द्यावे लागणार आहेत. अर्ज भरून दिल्यानंतर शासन अर्जात दिलेली माहिती व त्या दिव्यांगांनी आधार कार्ड काढताना दिलेली माहिती पडताळूनच नवीन युनिक आयडी तयार करून दिला जाणार आहे.

अपंगत्वानुसार कार्डचा रंग
युनिक आयडी कार्डचे रंग लाभार्थ्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार असणार आहे. यात ४० टक्‍क्‍यांपर्यंतच्या दिव्यांगांना पिवळ्या रंगाचे, ४० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत अपंगत्व असणाऱ्यांना निळ्या रंगाचे, तर ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्यांना लाल रंगाचे ओळखपत्र दिले जाणार आहे. युनिक आयडी मिळवण्यासाठी अपंगांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे.

‘युनिक कार्ड’ महत्त्वाचा दस्तऐवज
हे रंगीत युनिक कार्ड आधार कार्डच्या धर्तीवर देशभरात एकच असेल. हे कार्ड दाखवून अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशभरात कोठेही घेता येणार आहेत. आधार कार्ड युनिक कार्डशी लिंक असेल. त्यावर फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांकासह इतर माहिती नमूद केली जाईल. दिव्यांगांच्या सर्व सुविधांसाठी हे एकच कार्ड पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे हे कार्ड दिव्यांगांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.