नांदेडमध्ये अतिवृष्टी; दोघे वाहून गेले; 3 जनावरांचा वीज पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

१४४ मिमी पावसाची नोंद
शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस पडला. मात्र, रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागांतील घरांत तसेच रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले. रविवारी (ता.२०) सकाळपर्यंत शहरात १४४ तर जिल्ह्यात १४० मिमी पाण्याची नोंद झाली. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. अनेकांना घरातील सामान पलंगावर ठेवून रात्र काढावी लागली. काही ठिकाणच्या गटार व नाल्यांची सफाई झाली नसल्याने त्यातील पाणीही घरात घुसल्याने दुर्गंधीशीही सामना करावा लागला. गटारातील पाणी व कचराही रस्त्यांवर आला. मालेगाव रस्त्यावरील भावसार चौकात पाण्याचे तळे साचल्याने काहीवेळ तेथे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

नांदेड : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता.१९) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले. तसेच सखल भागांतील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. शिवाय मुदखेडला एक शेतकरी तर शहरातील पांडुरंगनगर येथील एक १२ वर्षाचा मुलगा पुरात वाहून गेला. लोहा तालुक्यात तीन जनावरांचा वीज पडून मृत्यु झाला.

शेतकऱ्यांसह सर्वच नागरिक पावसाची आतुरतेने वाट बघत होते. शनिवारी पहाटेपासून ढग दाटून आले. दिवसभर रिमझिम होती. रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदी, नाले दुथडी भरून वहात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड शहरातीलही सखल भागांतील घरांमध्ये गुडघ्याइतकाले पाणी साचल्याने नागरिकांना रात्र जागावी लागली.

नांदेड शहरातील पांडुरंगनगर परिसरातील नाल्याच्या पुरामध्ये शुभम भगवान शिंदे (वय १२) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. तर पांगरगाव (ता.मुदखेड) येथील संभाजी तळणे (वय ३५) या तरूण शेतकऱ्याचा पुरामध्ये वाहून गेल्याने मृत्यू झाला. दोन्ही घटनांमध्ये प्रशासनाकडून असहकार्य मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लोहा तालुक्यातही वीजांमुळे तीन जनावरे दगावली आहेत.

विष्णुपुरीत ६० टक्के पाणीसाठा
शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६० टक्के पाणीसाठा झाला. यंदा पावसाअभावी धरणातील पाणीसाठा केवळ १२ टक्के इतकाच शिल्लक राहिला होता.त्यामुळे शहराला दोन-तीन दिवसाआड पाणी मिळत होते. मात्र शनिवारच्या पावसामुळे पहाटे आठ वाजेपासून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात ६० टक्के पाणीसाठा झाला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :