नांदेड शहरातील मुख्य रस्त्याची चाळणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मागील महिन्यात महापालिकेने उड्डाण पुलासह मोजक्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली. अवघ्या महिन्यात अानेक ठिकाणचे खड्डे जशास तसे झाल्याने पुढे पाठ अाणि मागे सपाट अशी अवस्था झाली

नांदेड - महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील मुख्य रस्ते खड्ड्यांनी माखले आहेत. रेल्वे स्थानक, जिल्हापरिषद कार्यालय, शिवाजी महाराज यांचा पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय या मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

मागील महिन्यात महापालिकेने उड्डाण पुलासह मोजक्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली. अवघ्या महिन्यात अानेक ठिकाणचे खड्डे जशास तसे झाल्याने पुढे पाठ अाणि मागे सपाट अशी अवस्था झाली. पावसाळा पूर्व उपाय योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यांच्या दूरूस्तीचा विसर पडल्याने शहर वाहतूकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

महापालिकेसह जिल्हापरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, वजिराबाद पोलिस ठाणे, पवित्र गुरूद्वारा कडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच वाहतूकीची वर्दळ असते. रेल्वे स्थानक ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावरील खडी, डांबर उखडल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे