एस.टी.चा नांदेड विभाग उत्पन्नात राज्यात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

"एस.टी.महामंडळाचे नांदेड विभागाचे उत्पन्न अजून वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून मे महिन्यात उत्पन्न वाढीत राज्यात नांदेड विभागाने प्रथम क्रमांक मिळविला. यात विभागातील नऊ आगारातील सर्वच आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षकीय कर्मचारी, चालक - वाहक, मेकॅनिक व अन्य कर्मचाऱ्यांचाही वाटा आहे. त्यामुळे तेही माझ्यासोबत अभिनंदनास पात्र आहेत."
- विभागीय नियंत्रक कोलारकर

नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस.टी.च्या मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभाग राज्यात प्रथम आला आहे. यानिमित्ताने नांदेड विभागाचे विभाग नियंत्रक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला.

एस.टी. महामंडळाच्या बसेस सध्या अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड देत प्रवाशांची अखंडपणे गेल्या ६८ वर्षापासून सेवा देत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीच्या संकटावर मात करीत प्रवाशांसाठी विविध सोयी- सवलती देत आहेत. मे २०१७ या महिन्याच्या उत्पन्नात नांदेड विभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून सरासरीच्या तीन करोड एवढे उत्पन्न नांदेड विभागाने गाठले आहे. नांदेड विभागाचे कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेले विभाग नियत्रंक नंदकुमार कोलारकर यांनी नांदेड विभागाचे विभाग नियत्रंक म्हणून मे २०१६ मध्ये सुत्रे स्वीकारली. गेल्या वर्षभरापासुन एसटीचे नांदेड विभागाचे उत्पन्न कसे वाढेल याकडे सातत्याने लक्ष दिले. त्यातच डिझेल व आँईल बचत, बसेसच्या फेऱ्या व किलोमीटर मध्ये वाढ तसेच शटल बसेसची सेवा आदी बाबींवर त्यांचा गेल्या वर्षभरापासून भर होता. यामुळे नांदेड विभागाचे उत्पन्न मे मध्ये सरासरी तीन कोटी एवढे वाढले आहे. नांदेड विभागात एकुण नऊ आगार असून सर्वच आगाराकडे त्यांचे नेहमीच बारकाईने लक्ष राहते.

नांदेड विभागाचे उत्पन्न वाढीसाठी गेल्यावर्षीपासून सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या विभाग नियत्रंक नंदकुमार कोलारकर यांचा नुकताच मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात राज्यातील सर्व विभाग नियत्रंकाच्या उपस्थितीत एस.टी.चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ते आगाराला अचानक भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कसुरी अहवाल देतात.